मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित आचारसंहितेच्या काळात तब्बल ३ कोटी १० लाख १७ हजार २० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर तब्बल ०८ लाख ३ हजार ३३० रुपये किंमतीची १२३७ लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. ५५ किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याचा बाजारभाव ४४ कोटी ९५ लाख ०७ हजार २३७ रुपये एवढी आहे. महापालिकेच्या निवडणूक भरारी पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २ हजार ०२५ करता आचारसंहितेच्या काळात महापालिकेच्या भरारी पथकाच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आचारसंहिता कक्षाच्यावतीने १६ जणांवर गुन्हे अदखलपात्र आणि १३ जणांवर गुन्हे दखलपात्र नोंदवण्यात आले आहे. तसेच ५२ दारुगुळा तसेच परवानाधारक व्यक्तींकडून ३६ रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. ११५ धारदार शस्त्रे पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कारवाईत प्रतिबंधात्मक कारवाई करताना २४५० जणांवर प्रलोभन तसेच इतर अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ५१ जणांना गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. १०६ जणांना फरारी तसेच फरारी आरोपी घोषित करण्यात आले आहे, तसेच एमपीडीए अंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.






