Monday, January 12, 2026

इंडिगो फ्लाईटला हवेत पक्षाची धडक! पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले २१६ लोकांचे प्राण

इंडिगो फ्लाईटला हवेत पक्षाची धडक! पायलटच्या प्रसंगावधानाने वाचले २१६ लोकांचे प्राण

वाराणसी : हवेत उड्डाण करत असताना इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानाला पक्षाची जोरदार धडक बसल्याची गंभीर घटना रविवारी संध्याकाळी घडली. गोरखपूरहून बेंगळुरूकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E-437 या विमानाच्या पुढील भागाला (नोज सेक्शन) या धडकेमुळे नुकसान झाले. विमानात एकूण २०६ प्रवासी असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

धडकेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वैमानिकाने तातडीने वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत फ्लाईट वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. संध्याकाळी ७.०५ वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

विमानाच्या पुढील भागाला तडे

लँडिंगनंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत विमानाच्या पुढील भागाला तडे गेल्याचे स्पष्ट झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन वैमानिकाने पुढील उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी ही फ्लाईट अधिकृतपणे रद्द करण्यात आली. वैमानिकाच्या या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

२१६ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

सर्व प्रवाशांना रात्री ८.४० वाजेपर्यंत सुखरूपपणे विमानातून उतरवण्यात आले. इंडिगो प्रशासनाने तात्काळ हालचाल करत प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था वाराणसीतील विविध हॉटेल्समध्ये केली गेली तसेच इतर पर्यायी प्रवास व्यवस्थेबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली.

तांत्रिक तपासणी सुरू

विमानाला बे नंबर-०३ वर उभे करण्यात आले असून तांत्रिक पथकाकडून सखोल तपासणी सुरू आहे. तपासणीत विमानाच्या पुढच्या भागाला नुकसान झाल्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, वैमानिकाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Add Comment