वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (११ जानेवारी) म्हटले की, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सरकारपासून इराणला मुक्त करण्यात मदत करण्यास अमेरिका तयार आहे. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की इराण कदाचित स्वातंत्र्याच्या दिशेने पाहत आहे आणि त्याला अमेरिकेची मदत उपलब्ध आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन इराणवर संभाव्य हल्ल्यासाठी प्राथमिक योजना तयार करत आहे. न्यूयॉर्कच्या वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकी अधिकारी इराणविरोधात ट्रम्प यांनी अलीकडे दिलेल्या इशाऱ्यानंतर पुढील पावले कोणती उचलावीत, यावर चर्चा करत आहेत. अहवालानुसार, एक पर्याय म्हणून इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ना अमेरिकन लष्कराची तैनाती करण्यात आलेली आहे, ना कोणतेही लष्करी उपकरण पाठवण्यात आले आहे.
याआधी ट्रम्प यांनी इराणला आंदोलकांच्या हत्या थांबवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी इराणी अधिकाऱ्यांना गोळीबार न करण्याचा इशारा देत म्हटले की, तसे केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देईल.






