बंगळुरू : आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय महिला इंजिनिअरचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र पोलिस तपास पुढे जाताच हा प्रकार अपघात नसून पूर्वनियोजित आणि क्रूर खून असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणात अवघ्या १८ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्या कृत्याने संपूर्ण शहर हादरले आहे.
ही घटना बंगळुरू शहरातील राममूर्ती नगर परिसरातील सुब्रमणि लेआऊट येथे घडली. शर्मिला डिके (वय ३४) या एका खासगी आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. ३ जानेवारी रोजी त्यांच्या भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. घरात आग लागल्याचे चिन्ह दिसत असल्याने सुरुवातीला हा मृत्यू गुदमरून झालेला अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
तपासात उलगडले धक्कादायक सत्य
पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची सखोल पाहणी केल्यानंतर संशय अधिक बळावला. वैज्ञानिक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असतानाच मृत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या कर्नाल कुराई (वय १८) याच्यावर संशय बळावला.
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. ३ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपीने खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने शर्मिला यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
विरोध केल्यानंतर हिंसाचार
शर्मिला यांनी ठाम विरोध करताच आरोपी आक्रमक झाला. झालेल्या झटापटीत त्यांना गंभीर इजा झाली आणि त्या बेशुद्ध पडल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच, आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी घरातील काही वस्तूंना आग लावून हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृत महिलेचा मोबाईल फोनही सोबत नेल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र तांत्रिक विश्लेषण आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली.
खुनाचा गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१ ) (खून), ६४ (२ ), ६६ आणि २३८ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद असलेले हे प्रकरण आता खुनात रूपांतरित झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे बंगळुरूतील आयटी क्षेत्रात तसेच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.






