कथा : प्रा. देवबा पाटील
रोजच्याप्रमाणे सीता व नीता सायंकाळी या शाळेतून घरी आल्या. आपला गृहपाठ आटोपून मावशीला प्रश्न विचारू लागल्या. “मावशी! कधी कधी सकाळी किंवा संध्याकाळी आपणास आकाश मस्तपैकी रंगीत झाल्यासारखे दिसते.” नीताने आपल्या निरीक्षण बुद्धीची चमक दाखवली. “हो ना गं मावशी! हे आकाश असे केव्हा केव्हा रंगीबेरंगी कसे काय होते?” सीताने प्रश्नार्थक दुजोरा दिला.
“बरं का मुलींनो!” मावशी सांगू लागली, “सूर्यप्रकाशाचे विकिरण हे ढगांतील जलबिंदूंच्या आकारावर अवलंबून असते. प्रकाशाचे विकिरण हे ज्या कणांवरून होते त्या कणांचा आकार जर प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान असेल तर आकाशात निळ्या रंगाचा प्रकाश पसरतो; परंतु जर धूलिकण, पाण्याचे थेंब, हवेचे रेणू संघटित झाले व वातावरणातील कणांचा आकार हा प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा मोठा झाला तर पसरलेल्या निळ्या प्रकाशामध्ये इतर लांब तरंगलांबीचे तांबडा, पिवळा, करडा वगैरे इतर प्रकाशसुद्धा असतात. सकाळी व संध्याकाळी आकाशात ढग असताना सहसा असे विविध रंगांचे मिश्रण आकाशात आपणास दिसते म्हणजेच आकाश रंगीत दिसते. यामध्ये जर पिवळ्या तरंगाचे प्रमाण जास्त असेल तर बऱ्याच वेळा सायंकाळी आकाशात आपणास पिवळाधम्मक प्रकाश पडलेला दिसतो. त्यालाच ‘सांज खुलली’ असे म्हणतात.”
“पण मावशी आपाणास ढगांतून खाली प्रकाश कसा काय दिसतो?” नीताने प्रश्न केला.“ढगांमध्ये अनंत धूलिकण नि पाण्याचे अगणित थेंब असतात. ढगावर प्रकाश पडला म्हणजे काही प्रकाश ढगावरून म्हणजे त्यातील थेंबांवरून नि कणांवरून परावर्तित होतो, काही ढगात शोषला जातो तर काही ढगातून आरपार पलीकडे जातो. आपणास ढगातून आरपार जाणारा व खाली झिरपणारा प्रकाश दिसतो. ढगातून प्रकाश किती आरपार जाईल हे त्या ढगातील धूलिकण, बाष्पकण व जलकणांच्या प्रमाणावर अवलंबून असते. ज्या ढगात धूलिकण, बाष्पकण व जलकणांचे प्रमाण भरपूर असते तो ढग मोठा, जाड व दाट असतो व ज्या ढगात हे प्रमाण कमी असते तो लहान, पातळ व विरळ असतो.” मावशीने स्पष्टीकरण दिले. “मावशी! काही ढग काळे तर...” नीताचे बोलणे मध्येच तोडत “...काही ढग पांढरे का दिसतात?” सीताने एकदम विचारले.
“अरे व्वा! दोघींच्याही डोक्यात एकाचवेळी एकच विचार आला.” मावशी हसत हसत सांगू लागली, “ढग हे प्रारंभी विरळ असल्यामुळे पांढरे असतात व ते कापूस पिंजल्यासारखे दिसतात. नंतर अनेक ढग एकत्र झाले की ते दाट होतात व करड्या रंगाचे बनतात. जास्त ढगांचे एकत्रीकरण झाले म्हणजे ते काळ्या रंगाचे बनतात. वेगवेगळ्या ढगांमधील धूळ, पाणी व वाफ यांचे प्रमाणसुद्धा वेगवेगळे असते. त्यानुसारही त्यांचे रंग बनतात.”
मावशी पुढे म्हणाली, “ढगावरून प्रकाश भरपूर परावर्तित झाला किंवा आरपार खाली झिरपला तर तो पांढराशुभ्र दिसतो व चमकतोसुद्धा. सहसा विरळ ढग कापसासारखे पांढरे दिसतात. ढगावरून परावर्तित होणारा किंवा खाली झिरपणारा प्रकाश कमी असेल तर तो ढग करड्या रंगाचा दिसतो. जाड ढगामध्ये प्रकाश जास्त शोषला जातो व फारच कमी खाली झिरपतो त्यामुळे तो ढग काळा दिसतो. असे काळे ढग हे पावसाचे ढग असतात कारण त्यांमध्ये जलकणांचे प्रमाण खूपच जास्त असते. थोडक्यात ज्या ढगांमध्ये फक्त बाष्पकणच असतात व जलकण नसतात किंवा जलकण असलेच तर ते आकाराने लहान, संख्येने कमी व विरळ असतात ते पांढरे दिसतात. ज्या ढगांमध्ये जलकण हे अमाप, मोठे व घनदाट असतात ते काळे दिसतात. उंचावरील थंड हवेमुळे ज्या ढगातील वाफेचे थंड पाणी होऊ लागले म्हणजे तो ढग अधिक काळा दिसू लागतो.” मावशीने सविस्तर समजावून सांगितले. एवढ्यात शेजारची काकू घरी आली व मावशीशी बोलू लागली. त्यांच्या विद्यार्जनात खंड पडला.






