मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ‘मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांना समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्रातील आदरातिथ्य क्षेत्रातील अग्रगण्य संघटना असलेल्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) यांनीही मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे.मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन / निवडणूक) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत सर्वसमावेशक व बहुआयामी मतदार जागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्यांचे आयोजन, मतदार जनजागृती फेरी, प्रभात फेरी, शाळा–महाविद्यालयांमधील उपक्रम, विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांसाठी मतदान संकल्पपत्र भरून घेणे, तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक माध्यमांतून मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, आहार संघटनेने मुंबई महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या सहकार्याने मतदार जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. आहार ही संस्था महाराष्ट्रातील सुमारे ८,००० हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व परमिट रूम्सचे प्रतिनिधित्व करत असून, राज्यभरातील ६५ जिल्हा संघटनांशी संलग्न आहे. हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचा सार्वजनिक संपर्क लक्षात घेता, नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केलेल्या मतदारांना आहार संघटनेशी संलग्न असलेल्या रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशिष्ट सवलत देण्यात येणार आहे, असे आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले. मतदान हा लोकशाहीचा कणा असून, “मी समाजाचा एक जबाबदार घटक आहे” ही भावना नागरिकांमध्ये निर्माण करून, मतदानाद्वारे कर्तव्ये पूर्ण करणे हा या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदार सहभाग वाढविण्यासाठी प्रशासन, विविध शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था व व्यावसायिक संघटना एकत्रितपणे कार्यरत असल्याचे सकारात्मक चित्र या माध्यमातून समोर येत आहे.






