संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत घडलेला हा एक किस्सा. आचार्य अत्रे यांनी एक या त्यांच्या अग्रलेखातून यशवंतरावांवर टीका करताना ‘निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा या मथळ्याखाली मोठा अग्रलेख लिहिला होता. यशवंतरावांना हा अग्रलेख वाचून खूप वाईट वाटलं, पण त्यांनी आचार्य अत्रेंना ताबडतोब उत्तर न देता दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणाले,
“अत्रे साहेब, कालच्या अग्रलेखात आपण माझा निपुत्रिक म्हणून उल्लेख केलात. त्याबद्दल मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की, १९४२ च्या “चले जाव चळवळीच्या वेळी इंग्रज सरकारच्या पोलिसांनी मला पकडण्यासाठी माझ्या घरावर धाड टाकली, पण मी त्यांच्या हाती सापडलो नाही. म्हणून त्यांनी तो राग माझ्या पत्नीवर वेणूवर काढला. वेणू त्या वेळी गरोदर होती. पोलिसांनी काठीनं वेणूला मारलं, पाठीवर आणि अगदी पोटावरदेखील. त्या मारामुळे वेणूचा गर्भपात झाला. एवढच नव्हे, तर तिच्या गर्भाशयाला कायमची इजा झाली. त्यामुळे तिला पुन्हा गर्भधारणा होऊ शकली नाही. बस्स. एवढंच सांगायचं होतं मला.”
यशवंतरावांचे ते बोलणं ऐकून आचार्य अत्रे हेलावले. आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे हे त्यांना उमगलं. त्यांनी यशवंतरावांच्या घरी जाऊन वेणूताईंची क्षमा मागितली आणि त्यानंतर जाहीर सभेतही या घटनेबदल यशवंतराय आणि वेणूताई यांची क्षमा मागून पश्चात्ताप व्यक्त केला. ही घटना आज आठवण्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या वेळी अनेक पक्षांनी प्रचार करताना सभ्यतेची किमान पातळी सोडून प्रचार केला होता. एकमेकांचं चारित्र्यहनन ही तर सामान्य बाब झाली, पण त्याचबरोबर एकमेकांच्या शारीरिक व्यंगाबद्दल, एखाद्याच्या पत्नीबदल, वडिलांबद्दलदेखील नको नको त्या शब्दांत टीका केली. आपण कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान न राखता केवळ समोरच्याला जखमी करणारे बोचरे शब्द वापरायचे, टोमणे मारायचे, कुजकट बोलायचे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची सभ्यता निश्चितच नाही.
“मनात आलं ते बोलून मोकळं झालं’ असा बेधडकपणा जरी काही प्रमाणात योग्य असला तरीही त्याला संयमाचं कुंपण आवश्यक आहे. धारदार शब्दांनी समोरच्याचा अपमान करून जखमी करण्यापेक्षा नीट विचारपूर्वक आणि मुद्देसूद बोललं तर आवश्यक तो परिणाम निश्चिपणे साधता येतो. तिखट, तिरसट बोलण्यापेक्षा स्पष्ट तरीही गोड शब्द वापरले तर... तुकाराम महाराजदेखील त्यांच्या एका अभंगात हेच सांगतात. घासावा शब्द । तासावा शब्द । तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ।। बोलावे बरे। बोलावे खरे । कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।
ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्याच्यावर आपल्या शब्दांचा काय परिणाम होईल याचा विचार करताना सदसदविवेकबुद्धी वापरायला हवी. कारण जिभेला झालेली जखम बरी होण्यास फार वेळ लागत नाही, पण जिभेमुळे झालेली जखम अनेकदा आयुष्यभर भरून निघत नाही. याच विषयावरची कवयित्री निशा वर्तक यांचीही एक कविता आहे. जी आपल्याला विचारपूर्वक आणि विवेकाने बोलण्याचा संदेश देते, जेणेकरून आपले बोलणे प्रभावी आणि सकारात्मक ठरेल. त्या म्हणतात -
जिभेला धार नको नको नको रे अशी जिभेला धार नको । जागोजागी शब्दांचा हा वार नको ।। जखमी करती तीर तुझे हे शब्दांचे । एकसारखा नात्यांचा उद्धार नको ।। जखमेवरती मीठ चोळणे बरे नव्हे । तिखट बोचऱ्या शब्दांचा भडीमार नको ।। शस्त्रावाणी संहारक ते शब्द कधी । जपून वापर शब्दशस्त्र, संहार नको।। कधीतरी तू प्रेमानेही बोल सख्या। उपहासाचा असा सारखा मार नको।। मुखातून एकदा निघालेले शब्द पुन्हा मागे घेता येत नाहीत तेव्हा कधीही चांगले आणि खरे बोलावे, कोणाच्याही मनाला दुखावणारे शब्द वापरू नयेत.






