स्मृतिगंध : लता गुठे
आज सकाळी सकाळी एक बासरीवाला इमारतीच्या खालून बासरी वाजवत चालला होता. खूप सुंदर सूर त्यामधून बाहेर पडत होते. ‘सावन का महिना पवन करे शोर!’ हे गाणं तो बासरीवर वाजवत होता... ते कानावर पडताच क्षणात आनंदाची लहर मनात चमकून गेली.
मला समजायला उमजायला लागल्यापासून बासरीने माझ्या मनामध्ये सुखाचं सरोवर निर्माण केलं. रोज संध्याकाळी दूरवरच्या शाळेतून आम्ही गावात चालत येताना हे दृश्य अनेकदा अनुभवलेलं... सूर्य मावळतीकडे झुकला की हिरव्यागार कुरणांमधून वाऱ्याच्या पंखावर बसून बासरीचे स्वर सारा परिसर मंत्रमुग्ध करायचे. दुरून येणारा मुरलीरव ऐकताना भान हरपून जायचे. गुराखी घराकडे येत असल्याची ती चाहूल असायची. त्या आवाजाने गाईंची वासरं हंबारायला लागायची. बासरीचा मुरलीरव केवळ ध्वनी निर्माण करत नाही तर तो काळ, अवकाश आणि माणसाच्या अंतःकरणाला एकाच वेळी स्पर्श करत मनामध्ये पवित्र भावना निर्माण करतो. हे बऱ्याच वर्षांनंतर जरा मोठी झाल्यावर समजायला लागलं.
बासरीचा स्वर ऐकताना असं वाटायचं की आकाशाच्या मावळतीच्या त्या सुंदर रंगांमध्ये कृष्णाचाही सावळा रंग उतरला आहे. माणसांबरोबर निसर्गाचेही अस्तित्व तितकेच सुरांना प्रतिसाद द्यायचे. नदीच्या निळ्याशार पाण्यामध्ये उतरलेली सोनेरी सूर्यकिरणं जणू काही बासरीच्या सुरावर नृत्य करत आहेत. इतकं सुंदर ते दृश्य पाहून ती मोहक संध्याकाळ मनात रेंगाळत राहायची.
जसजसे बासरीचे सूर जवळ येऊ लागायचे तसतसे राधाकृष्णाच्या ऐकलेल्या गोष्टी आठवायला लागायच्या. मुरली म्हणजे केवळ लाकूड किंवा बांबूची नळी नव्हे; ती भारतीय भावविश्वाची, अध्यात्माची आणि लोकजीवनाची सजीव प्रतिमा आजही मनामध्ये तशीच आहे.
आता अधून मधून बासरीवाला इमारतीच्या खालून बासरी वाजवत आला की मला ते लहानपणीचे दिवस आठवतात. हातातील सर्व कामं बाजूला ठेवून मी त्या सुरांना मनाची खिडकी उघडी करून आतमध्ये घेते. बासरीवाल्याकडे पाहताना त्याचा हेवा वाटू लागतो. एकदा तर मी जत्रेतून बासरी विकत घेऊन आले. ते दिवसभर फुंकत राहिले; परंतु गुराखी मुलांसारखे बासरीचे सूर काही बाहेर पडेनात. बरेच दिवस प्रयत्न करूनही बासरी काही वाजवता आली नाही ही खंत मला आजही खिडकीतून बाहेर पाहताना जाणवली. तो मुरलीरव दिवसभर मनामध्ये रेंगाळत होता. त्याच्याशी समरस झालेली भावनेची वलयं मनाला सुखावत होती. तो बासरीवाला आणि त्या बासरीचे सूर हळूहळू दूर जाऊ लागतात तेव्हा आपसूकच मन इतिहासात जाऊन पोहोचते.
एकदा एक बासरीवाला गावामध्ये आला होता त्याने सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते ती अशी, मनुष्य जेव्हा प्रथम निसर्गाच्या आवाजाशी संवाद साधायला शिकला तेव्हाच कदाचित वाऱ्याच्या शिट्टीसारखा आवाज काढणारी नळी त्याच्या हाती लागली असावी. बांबू, कास, उसाचे दांडे यांतून येणारा स्वच्छ, मृदू स्वर माणसाला आकर्षित करीत गेला. सिंधू संस्कृतीपासून ते वैदिक काळापर्यंत, मुरलीसदृश वाद्यांचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात वायू, इंद्र यांच्याशी संबंधित संगीताचे संदर्भ सापडतात, तर नंतरच्या काळात मुरली कृष्णाशी इतकी एकरूप झाली की तिचा विचार करताना श्रीकृष्णाचे रूप डोळ्यांसमोर उभे राहते.
कृष्ण आणि मुरली यांचे नाते हे अत्यंत कोमल नाते आहे. कृष्णाच्या अधरांवर विसावलेली मुरली केवळ गोकुळातील गोप-गोपिकांना मोहात पाडत नव्हती, तर ती संपूर्ण सृष्टीला मंत्रमुग्ध करत असे. वृंदावनातील वने, यमुनेचा प्रवाह, गाई-वासरं, पक्षी, झाडं स्तब्ध होऊन ती बासरी ऐकत राहायचे. काही वेळ सारं काही शांत होऊन त्या मुरलीच्या मधुर सुरामध्ये तृप्त तृप्त होऊन जायचं आणि कृष्ण म्हणे मी फक्त राधेसाठी बासरी वाजवतो.






