नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
जुन्या आठवणी निघाल्या की, आठवते ते चाळीतले आमच्या शेजारी राहणाऱ्या बापू काकांचे घर. मूलबाळ नसल्याने हेमा काकी काहीशा उदास दिसत. दर बुधवारी रात्री चाळीतले अनेकजण त्यांच्याकडे ‘बिनाका गीतमाला’ ऐकायला जमत. रेडीओच ऐकायचा असल्याने पाहायचे काहीही नव्हते. मग आमची नजर आपोआप भिंतीवरून फिरे. भिंतीवर एक लांब लाकडी पट्टी ठोकून बापू काकांनी अनेक तसबिरी लावल्या होत्या. मागच्या खिळ्यांना त्या तिरप्या लटकावलेल्या असल्याने उंचावर असूनही सहज दिसत. शंकर, गणपती, हातातून नाणी पडत असलेली लक्ष्मी आणि बापू काकांच्या आई वाटणाऱ्या एका बाईंची फ्रेम. छताजवळ एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तिरपी टांगलेली रेडीओची जाळीदार एरियल.
रेडीओ सुरू असताना डायलवरील बटनाजवळ एक छोटासा चौकोन प्रकाशमान व्हायचा. त्या पोपटी तेजस्वी रंगाच्या चौकोनात अधूनमधून हालचाल होत राहायची. पावसाळी दिवसांत आवाजातली खरखर वाढली की त्या दिव्यातली हालचाल वाढायची. दाराच्या वरच्या भागात हेमा काकींनी तयार केलेला पोपटी बटनांच्या सशाची फ्रेम लावलेली होती. बहुतेक घरांत या सशांच्या किंवा बदकांच्या फ्रेम दिसत. रेडीओशेजारी एक उंच बाहुली उभी असे. क्रेप कागदाच्या भडक लाल रंगाच्या पट्ट्या एकावर एक लपेटून तिचा उंचच उंच झगा बनवलेला असे. तो इतका उंच होता की बहुधा तिचे पाय आतल्या आत तरंगत असावेत अशी शंका मला नेहमी यायची! हेमा काकी रोज सकाळी दारात रंगोळी काढायच्या. बहुतेक घरात ती पद्धतच होती. दारात शेणाचा सडा टाकून त्या मऊसूत झालेल्या अंगणातली पांढरीशुभ्र रांगोळी. त्यावर चटकन हळदीकुंकवाची एक रेघ उमटवली जाई. दारातल्या विटांच्या तुळसी वृंदावनाला पिवळा किंवा केशरी रंग दिलेला असे. त्यावर एखादी नक्षीही काढलेली दिसायची. वृंदावनाच्या कोनाड्यात सायंकाळी दिवा लावला जाई. घरातली लक्ष्मी हे काम काही स्तोत्र पुटपुटतच करायची.
हळूहळू सगळेच बदलत गेले. घरातल्या देवाच्या तसबिरी गेल्या. त्या जागी पती-पत्नीचे लग्नाचे काढलेले फोटो आले. ससे गेले, पाठोपाठ हळू चालत का होईना बिचारी बदकेही गेली. उंच लालभडक फ्रॉकवाली बाहुली गेली. रेडीओ गेले. अंगण गेले. सडारांगोळी बंद पडली. तुळशीची जागा अवघड इंग्रजी नावाच्या निर्जीव रोपट्यांनी आणि निवडुंगाने घेतली. कितीतरी बदल! खरे तर घरे आतून-बाहेरून बदलली.
मग माणसेही बदललीच की! घरगुती बापू काकांचे ‘मि. बापू प्रधान’ झाले! घरच्याच वाटणाऱ्या हेमा काकी परक्या ‘मिसेस प्रधान’ झाल्या. चाळीतल्या कोणत्याही घरात सरळ घुसण्याची जवळीक संपली. दिवाळीतल्या फराळाचीच काय अगदी रोजच्या भाजीचीही देवघेव बंद पडली. सर्व नात्यातली अमूर्त माया, ओलावा, आपलेपणा नकळत आटत गेला!
पण आठवणी थोड्याच जातात. त्या अजूनही चेहऱ्यावर कधी स्मितहास्य आणतात, तर कधी डोळे पाणावून टाकतात. घर म्हटल्यावर बापू काकांच्या रेडीओवर ऐकलेले असेच एक गाणे, आठवत राहते. सिनेमा होता ‘ऊन- पाऊस’(१९५४). एका आदर्श शिक्षकाच्या जीवनाची ही शोकांतिका होती. दिग्दर्शक होते राजा परांजपे! त्यांनी एक भूमिकाही केली होती. सोबत होत्या सुमती गुप्ते. त्याशिवाय धुमाळ, रंजन, गजाजन जहागीरदार, वसंत ठेंगडी, कला, वासुदेव पलांडे आणि राजन यांच्याही भूमिका होत्या.
कृतघ्न मुलांनी आई-वडिलांना वाटून घेऊन ताटातूट केलेल्या वृद्ध जोडप्याची व्यथा राजाभाऊ आणि सुमती गुप्ते यांनी हृदय पिळवटून टाकणाऱ्या अभिनयाने साकारली होती. त्यावरच रवी चोप्रांनी ‘बागबान’(२००३) बेतला होता असे म्हणतात. ‘ऊन-पाऊस’मधला राजाभाऊ-सुमतीबाईंनी जिवंत केलेला टेलिफोनवर बोलण्याचा प्रसंग ‘बागवान’मध्ये अमिताभ बच्चन व हेमा मालिनीने साकारला. सिनेमात गदिमांच्या लेखणीतून उतरलेले एक गाणे होते.
आशाताईंच्या आवाजातल्या त्या भावमधुर गीताला संगीत दिले सुधीर फडके यांनी! गाण्याच्या वेळचे दृश्य अगदी कौटुंबिक होते. बऱ्याच दिवसांनी बापू मास्तरांची मुले आणि जावई घरी आलेले असतात. सहजच मुलीला गाणे म्हणण्याचा आग्रह होतो. कुणालाही आपल्या मूळ गावात, हरवलेल्या निरागस लहानपणात, अलगद घेऊन जाणारे गदिमांचे शब्द होते -
‘आठवणींच्या आधी जाते,
तिथे मनाचे निळे पाखरू.
खेड्यामधले घर कौलारू,
घर कौलारू...’ पूर्वीची घरे म्हणजे निळुभाऊ खाडिलकरांनी एकदा अग्रलेखात उपमा दिल्याप्रमाणे ‘उभ्या झोपडपट्ट्या’ नव्हत्या. सगळीकडे बैठी घरे किंवा चाळी असत. घरांवर कौलेच असायची. कोकणातल्या खेड्यात तर घराभोवतीच शेतीही असायची. त्यातूनच एका घराकडून शेजारच्या घरात जायला पाऊलवाटा असत. एकंदर वातावरणच असे होते की, गदिमा त्याचे वर्णन ‘पाऊलवाटा अंगणी मिळती’ असे करतात. त्याकाळी साध्या माणसातही असणारी रसिकता आणि भक्तिभावामुळे दारापुढे जाई-जुई, शेवंती, पारिजात, काटेकोरांटी अशी फुलझाडे असत. कोकणात माडांसह एखादे आंब्याचे
झाडही असायचे.
‘हिरवी श्यामल भवती शेती,
पाऊलवाटा अंगणी मिळती.
लव फुलवंती, जुई शेवंती,
शेंदरी आंबा सजे मोहरू!
खेड्यामधले घर कौलारू.’
घर मोठे असेल तर तो जवळ-जवळ वाडाच असायचा. त्यात दाराच्या दर्शनी चौकोटीवर एक गणपतीची मूर्ती हमखास दिसायची. व्हरांड्यात झोपाळा असायचा. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यावर घराचा हा भाग उजळून निघायचा, जिवंत व्हायचा! हातात जपाची माळ घेऊन घरातली वृद्ध व्यक्ती जप करत किंवा हळू आवाजात एखादे भजन म्हणत बसलेली दिसायची. ते आजोबा किंवा आजी अधूनमधून झोका घेत असल्यामुळे झोपाळ्याच्या लोखंडी ‘कड्या कुरकुरू’ वाजत. गदिमा एखादे चित्र किती कमी शब्दांत उभे करतात! ‘अभंग कातर’ या शब्दांनी तर त्या व्यक्तीचे वयोवृद्धपण, सात्विक, सोज्वळ रूप डोळ्यांसमोर येते, प्रत्येकाला घरातली एखादी वडीलधारी व्यक्ती आठवून डोळे पाणावतात!
‘चौकट, तीवर बाल गणपती,
चौसोपी खण स्वागत करती.
झोपाळ्यावर अभंग कातर,
सवे लागती कड्या करकरू!
खेड्यामधले घर कौलारू.’
त्यावेळी हल्लीसारखी जिथे मोलकरीण एकदा किंवा दोनदा ‘जेवण बनवून’ जाते ते ‘किचन’ नव्हते, तर घरातली माऊली प्रेमाने स्वयंपाक करायची ते वत्सल ‘स्वयंपाकघर’ होते. तिथे आईचे काम सुरू असताना तिच्या हातातल्या हिरव्या, लाल बांगड्यांची किणकिण ऐकू यायची.
‘माजघरातील उजेड मिणमिण,
वृद्ध काकणे करिती किणकिण.
किणकिण ती हळू, ये कुरवाळू,
दूर देशीचे प्रौढ लेकरू!
‘खेड्यामधले घर कौलारू.’
माहेरी आलेल्या प्रौढ लेकरालाही ते थरथरणारे हात प्रेमाने कुरवाळत असत. गेले ना सगळे कधीच?! आता राहिली ही अशी हुरहूर लावणारी गाणी आणि क्वचित डोळ्यांत येणारे पाणी!