संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे
स्वराज्य प्रेरिका, स्वराज्य जननी, थोर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. खऱ्या अर्थाने ज्या छत्रपतींना जिजाऊंनी घडविले, ते छत्रपती जगाचे राजे होऊन गेले. सगळ्यांच्या हृदयावर त्यांनी नाव कोरले. अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडविताना ज्ञान, माहिती, कौशल्य, रणनीती रयत, लष्कर, लढाया-युद्ध या साऱ्या घटनांची नोंद पाहता या आदर्श मातेने क्षणाक्षणाला छत्रपती शिवरायांना घडविले आहे. अराजकतेच्या पार्श्वभूमीवर शिवराज्य, सुराज्य ही स्वप्ने बालपणीच छत्रपतींच्या स्वप्नात पेरली. छत्रपतींच्या संकटकाळी, दुःखावेळी सदैव राजमाता खंबीरपणे उभ्या राहिल्या. रयतेचे राजे कसे असावेत, छत्रपतींसारखे दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना, रंजल्या - गाजल्यांना महिलांना आदरणीय देणारे. प्रजाहितवादी साहेबांची शिकवण, जातीभेद निर्मूलन करून सर्वांना एका सूत्रात गुंतले. हातात हात घालून रोजी-रोटी दिली. कामकाज दिले. उदरनिर्वाह केला. ऐक्य, बंधुत्व समता आणि विश्वबंधुत्वाकडे नेण्याची ती दूरदर्शी कल्पना आजही प्रेरणादायी आहे. राजमातांनी छत्रपतींना आपल्या राजमुद्रेची सुरुवात असणारी अक्षरे प्रतिपच्चंद्रलेख लिहिलेली लक्षात असावीत म्हणून कपाळावर चंद्रकोर कोरण्यास सुरुवात केली. राजमुद्रेतील ही कोर पूर्णत्वाचे प्रतीक आहे. विश्वबंधिता हा शब्द लक्षात राहावा यासाठीच रयत आणि सैनिक यांनी प्रत्येकाच्या भाळी कपाळी चंदनाची गंध गोळी गोल पूर्ण चंद्र रेखावी. यामुळे सर्वांचेेे रक्षण होईल, ध्येयनिश्चितीपासून ध्येयप्राप्तीपर्यंत राजमाता अहोरात्र छत्रपतींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. इसवी सन १६४५ ते १६७४ असा २९ वर्षांचा सातत्यपूर्ण हिंदवी स्वराज्य उभारणीचा आणि माँसाहेबांचे योगदान, त्यांच्या उदरी लाभलेल्या देशाला जगाला एक थोर रत्न, अनमोल हिरा, अद्वितीय राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक, स्वधर्म संस्थापक भारत देशाला लाभलेले योगदान वरदानच म्हणावे लागेल. अशा आदर्श मातेने अभिमानास्पद राजा घडविला त्या स्वराज्य प्रेरिका, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेबांना शतशः वंदन. स्वतःसाठी जिजाऊंच्या चरित्रातून एक आदर्श घ्यावा. नजरेत अंगार, कमरेत तलवार, हातात शृंगार आणि हृदयात संस्काराचे भांडार हे जतन करावे. परिस्थितीशी दोन हात करता यावेत. संवेदनशील मन ठेवून संस्कृतीचे जतन करावे आणि संयम, शिस्त, शांती शालिनीता यांनी आपला लढा सत्यनायासाठी द्यावा, आपला स्वाभिमान जपावा म्हणून आदरांजली.
जिजा माऊली हे तुला वंदना ही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही...