पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील स्वच्छ झाल्याचे पहायला मिळत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ? एका आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुण्यात अवघ्या ७५ दिवसांत तब्बल ३०० किलोमीटर रस्त्यांचं काम पूर्ण करण्यात आलं असून हे रस्ते आता चकाचक झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) हे काम उच्च दर्जाच्या मानकांनुसार पूर्ण केल्याने सध्या पुणेकरांमध्ये याची जोरदार चर्चा आहे.
या मागच कारण असं की ,पुण्यात लवकरच पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा पहिल्यांदाच पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागात होणार आहे. जगभरातील ३५ देशामधील १३१ नामांकित सायकलपटू यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या मार्गासाठी पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, मावळ आणि हवेली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निकषांनुसार रस्त्यांची गुणवत्ता राखण्यासाठी सिमेंट बेस ट्रिटमेंट (CBT) पद्धतीचा वापर करून रस्त्यांचा पाया मजबूत करण्यात आला आहे. त्यानंतर दर्जेदार डांबरीकरण केल्यामुळे हे रस्ते पुढील किमान पाच वर्षे टिकाऊ राहतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पांतर्गत सुमारे १०० किलोमीटर रस्त्यांचं रुंदीकरणही करण्यात आलं आहे.
या संपूर्ण रस्ते प्रकल्पासाठी पीएमआरडीए, जिल्हा नियोजन समिती आणि राज्य सरकारच्या मदतीने सुमारे २९४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणी पूर्ण होणं ही बाब विशेष मानली जात आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे जरी हे काम वेगात झालं असलं, तरी पुणेकरांना आता अपेक्षा आहे की, अशीच गुणवत्ता आणि गती भविष्यातील सर्व रस्ते कामांमध्येही कायम राहावी. पुणे ग्रँड टूरमुळे केवळ क्रीडाक्षेत्रालाच नव्हे, तर शहराच्या पायाभूत सुविधांनाही मोठी चालना मिळाल्याचं चित्र सध्या दिसत आहे.