तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस
सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्तव्ये पार पाडण्यास गैरहजर राहिलेल्या एकूण ६ हजार ८७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी २ हजार ३५० अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. तर, वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अथवा नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यांस हजर न राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोमवारपासून पोलीस कारवाई केली जाणार आहे.अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बँक, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपनी, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड या शासकीय/ निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींतील अधिकारी - कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महानगरपालिका मुख्यालयात रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या बैठकीस सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळ उप आयुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अनुषंगाने गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी - कर्मचा-यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते. तरीही, जे अधिकारी - कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांना शनिवार १० जानेवारी २०२६ रोजी अंतिम संधी देण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांविरुद्ध रविवार, ११ जानेवारी २०२६ पासून निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, निवडणूक ही संविधानिक व कायदेशीर जबाबदारी असून, त्यामध्ये कसूर करणे हा गंभीर गुन्हा मानण्यात येतो. त्यानुसार, संबंधित ४ हजार ५२१ कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन पोलिसांमार्फत कारवाई सोमवारी १२ जानेवारी २०२६ पासून केली जाणार आहे. या कारवाईत अंतर्गत गुन्हा नोंद, दंडात्मक कारवाई तसेच विभागीय शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी मतदारांची संख्या आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता प्रशासनाला दिसून येत आहे. यादृष्टीने प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचे अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.






