महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
शुकदेव हे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील व पुराणातील एक तेजस्वी वैराग्यशील विद्वान व ज्ञानसंपन्न महर्षी म्हणून ओळखले जातात. महर्षी शुकदेव व्यासांचे पुत्र असून भागवत कथाकार व भागवताचे उपदेशक म्हणून त्यांना ओळखले जाते. वैराग्य ब्रह्मज्ञान व भक्ती यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात आढळतो. बालपणापासूनच त्यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले. परिक्षीत राजाला मिळालेल्या शापामुळे त्याच्या उर्वरित सात दिवसांच्या आयुष्यात भागवत श्रवण करण्याची त्याची इच्छा असल्याने महर्षी शुकदेवांनी परिक्षिताला भागवत कथा ऐकविली. मृत्यूच्या छायेतही भगवतभक्ती मानवाला मुक्ती मिळवून देते असे सांगून त्यांनी राजा परिक्षिताला तपश्चर्या कर्मकांड यापेक्षा नामस्मरण श्रवण कीर्तन आदींचा मार्ग सांगितला. गतजन्मी ते शुक (पोपट) असल्याने त्यांचे नाव शुकदेव व त्या जन्मात त्यांनी अमर कथेचे रहस्य ऐकल्याने ते अमर झाल्याचे मानले जाते.
काही ग्रंथात त्यांचा जन्म लाकडापासून झाल्याचे तसेच ते सांगितलेली गोष्ट जशीच्या तशी पुन्हा सांगत होते. त्यामुळे त्यांचा (शुक) पोपट असा उल्लेख केला जात असल्याचाही उल्लेख आहे. समाज बंधने व मान-अपमान यापासून ते अलिप्त होते.
पुराणातील त्यांच्या जन्मसंबंधीच्या उल्लेखाप्रमाणे एकदा माता पार्वतीला अमरत्वाचे गुपित ऐकण्याची इच्छा झाली. तिने महादेवाकडे याबाबत हट्ट केला, तेव्हा महादेव यांनी कथा सांगण्याची ठरविले. मात्र अन्य कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या कानी ही कथा पडू नये व त्याने हे रहस्य ऐकू नये म्हणून त्यांनी आपल्या सर्व गणांना वगळून माता पार्वतीला हिमालयातील अमरनाथच्या गुहेत नेले. गुहेत अंधार असल्याने महादेवांनी पार्वतीला कथा ऐकताना हुंकार देण्याची सूचना केली, जेणेकरून महादेवांना ती कथा ऐकत असल्याची जाणीव होईल.
अशाप्रकारे महादेव कथा सांगू लागले व माता-पार्वती हुंकार देऊन प्रतिसाद देऊ लागली. मात्र कालांतराने तिला झोप आली तेव्हा त्या गुहेत असणाऱ्या पोपटाने हुंकार करून प्रतिसाद दिला. महादेवांना याबाबत शंका येताच त्यांनी अंतर्ज्ञानाने पोपटाचे अस्तित्व ओळखले व त्याला मारण्यासाठी त्रिशूल फेकले. त्रिशुळापासून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी भयभीत झालेला पोपट आश्रयासाठी सर्व दूर फिरला व अखेर व्यास ऋषींच्या आश्रमात शिरला. व्यास पत्नी त्यावेळेला निद्रिस्त होती. तेव्हा त्याने सूक्ष्म रूपाने तिच्या मुखातून पोटात प्रवेश केला व गर्भ रूपाने राहू लागला. तो गर्भ रूपात असल्याने व शुकाने अमर कथा ऐकल्याने त्याला मारणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन महादेवाने आपला त्रिशूळ परत घेतला. पत्नी गर्भवती असल्याचे व्यासांना कळले. मात्र शुक भीतीने बाहेर येण्यास तयार नव्हता. अशा प्रकारे शुकदेव बारा वर्षे गर्भातच राहिले. तेव्हा व्यासांनी अंतर्ज्ञानाने वास्तविकता ओळखली व भगवान विष्णूंना पाचारण केले. श्रीविष्णूंनी शुकाची त्याला कोणीही मारणार नाही, अशा प्रकारे समजूत काढून त्याला बाहेर येण्यास प्रवृत्त केले. गर्भातच शुकदेवाने वेद व पुराणांचे ज्ञान आत्मसात केले होते. जन्म होताच शुकदेव बारा वर्षांचे होते.
वेदव्यासांनी शुकदेवाला वेद पुराणांचे भागवताचे ज्ञान दिले व चारही आश्रमांचे ज्ञान मिळविण्यासाठी मिथीला नरेश जनक राजाकडे पाठविले.जनकाकडून शुकदेवांनी ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थान व संन्यास या चारही आश्रमाचे ज्ञान प्राप्त केले. त्यांना संन्यास आश्रमाबद्दल ओढ निर्माण झाली व त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारण्याचे ठरविले. ते ऐकून व्यासांना अतिशय दुःख झाले. व्यासांनी त्यांची अनेक प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु शुकदेव आपल्या निर्णयावर ठाम राहिले.परिक्षिताला भागवत ऐकवल्यानंतर व परिक्षिताच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी शुकदेवही निजधामास गेले.






