Sunday, January 11, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

भारत विरुद्ध न्यूझीलंड  ‘वन-डे’ची आजपासून रणधुमाळी

स्टार खेळाडूंचे पुनरागमन; जयस्वाल-पंत कट्ट्यावर?

बडोदरा : भारतीय क्रिकेट संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी, रविवार (११ जानेवारी) सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या नव्या दमाच्या संघाशी भिडणार आहे. बडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे भारतीय संघात पुनरागमन. विजय हजारे ट्रॉफीमधील त्यांच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे संघाचे फलंदाजीचे पारडे जड झाले आहे. टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर कर्णधार म्हणून पुनरागमन करणाऱ्या शुभमन गिलसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत केवळ एक सामना खेळलेल्या गिलला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, त्यामुळे त्याच्या फॉर्मवर निवड समितीची नजर असेल. सलामीला कर्णधार गिलसोबत अनुभवी रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल हे जवळपास निश्चित आहे. ही जोडी स्थिर असल्याने फॉर्मात असलेल्या यशस्वी जयस्वालला पहिल्या सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता दाट आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे स्थान अढळ आहे. रोहित आणि विराट या दोघांनीही विजय हजारे करंडकात प्रत्येकी एक शतक झळकावून आपण फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या मालिकेतही दमदार सुरुवातीची अपेक्षा आहे. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजीला येईल. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या श्रेयसच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. यष्टिरक्षकाच्या जागेसाठी भारतीय संघात के. एल राहुल आणि ऋषभ पंत असे दोन तगडे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, ताज्या समीकरणानुसार राहुलला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत पंतला बॅक-अप कीपर म्हणून मैदानाबाहेर थांबावे लागू शकते.

संघात समतोल राखण्यासाठी भारत तीन अष्टपैलू खेळाडूंना संधी देऊ शकतो. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश असू शकतो. हे तिघेही फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात संघाला मजबूती देतील.

वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. संघात हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे; परंतु सुंदर आणि जडेजा दोघेही खेळल्यास हर्षित राणाला संधी मिळणे कठीण दिसते. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला प्राधान्य दिले जाईल. मात्र, अंतिम ११ खेळाडूंची अधिकृत घोषणा ११ जानेवारीला दुपारी १ वाजता टॉसच्या वेळीच स्पष्ट होईल.

तसेच न्यूझीलंड संघात काही बदल करण्यात आले आहे. मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ काही प्रमुख खेळाडू (रचिन रवींद्र, मिचेल सँटनर) यांच्याशिवाय मैदानात उतरणार आहे, ज्यामुळे त्यांच्या दुय्यम फळीतील खेळाडूंना संधी मिळेल.

...असा आहे भारताचा संभाव्य संघ :

  • रोहित शर्मा (सलामीवीर)
  • शुभमन गिल (कर्णधार आणि सलामीवीर)
  • विराट कोहली (मध्य फळी)
  • श्रेयस अय्यर (मध्य फळी)
  • के. एल राहुल (यष्टिरक्षक-फलंदाज) - अनुभवामुळे ऋषभ पंतच्या आधी संधी मिळण्याची शक्यता.
  • रवींद्र जडेजा (ऑलराउंडर)
  • वॉशिंग्टन सुंदर (ऑलराउंडर) - हार्दिक आणि अक्षरच्या अनुपस्थितीत महत्त्वाचा.
  • कुलदीप यादव (फिरकीपटू)
  • मोहम्मद सिराज (वेगवान गोलंदाज)
  • अर्शदीप सिंग (वेगवान गोलंदाज)
  • प्रसिद्ध कृष्णा (वेगवान गोलंदाज)

...असा आहे न्यूझीलंडचा संभाव्य संघ :

  • डेव्हॉन कॉनवे (यष्टिरक्षक आणि सलामीवीर)
  • विल यंग (सलामीवीर)
  • हेन्री निकोल्स (मध्य फळी)
  • डॅरिल मिचेल (ऑलराउंडर)
  • ग्लेन फिलिप्स (मध्य फळी)
  • मायकेल ब्रेसवेल (कर्णधार आणि ऑलराउंडर)
  • जोश क्लार्कसन (ऑलराउंडर)
  • काईल जेमिसन (वेगवान गोलंदाज)
  • झॅक फोल्क्स (वेगवान गोलंदाज)
  • जेकब डफी (वेगवान गोलंदाज)
  • आदित्य अशोक (फिरकीपटू)

सराव सत्र मस्तीचाच : भारतीय खेळाडू कसून सराव करत असताना या सराव सत्रात विराट कोहली मज्जा मस्करी करताना दिसला. भारतीय संघाची माजी कर्णधार रन अप करताना अर्शदीप सिंगकडे पाहत होता आणि तो जवळ येताच त्याने त्याच्यासारखे पळण्याची अॅक्शन केली. विराट नकल करत होता, तेव्हा रोहित शर्मा मागे उभं राहून खळखळून हसताना दिसला. विराट कोहलीने दोन वर्षानंतर त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले. भारताच्या सराव सत्रातील या फोटोमध्ये विराटसह लोकेश राहुल, यशस्वी जयस्वाल व हर्षित राणआ दिसत होता. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या वन डे मालिकेत प्लेअर ऑफ दी सीरिज होता. त्याने त्या मालिकेत तीन सामन्यांत १५१ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या. त्याने सलग दोन सामन्यांत शतक आणि नंतर अर्धशतक झळकावले.

Comments
Add Comment