Sunday, January 11, 2026

कोर्टाच्या केसमध्ये फ्रॉड

कोर्टाच्या केसमध्ये फ्रॉड

क्राइम : अॅड. रिया करंजकर

काळानुसार बदलावं हा निसर्गाचा नियमच आहे. तसेच आधुनिकीकरण होत गेल्यामुळे अनेक बदल होत गेले, त्यापैकी एक बदल म्हणजे ऑनलाइन झालेली जागतिक क्रांती. घरबसल्या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाइन मागवू शकतो. ऑनलाइन पेमेंट करू शकतो. सर्व काही ऑनलाइन पद्धतीने चालू आहे पण याच गोष्टीमुळे लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. सायबर क्राईम वाढलेला आहे.

रवी हा नावाजलेल्या बँकेमध्ये मॅनेजर होता. काही वर्षे त्याने मुंबईमध्ये काढल्यानंतर त्याच बँकेने त्याची महाराष्ट्राच्या बाहेर नियुक्ती केली. तेथे गेल्यानंतर तो व्यवस्थित काम करत होता. एवढ्या वर्षांमध्ये त्याच्या कामाबद्दल बँकेतून किंवा बँकेच्या अकाउंट होल्डरकडून कोणती तक्रार नव्हती.

अचानक एक दिवस त्याला एका वकिलाचा मेसेज आला, की बोरिवली कोर्टामध्ये १३८/१४८ केस चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही विटनेस म्हणून हजर राहायचे आहे. त्यासाठी वकिलाला संपर्क करा, असा सतत फोन व मेसेज त्याला येत होते. त्याला नेमकं समजेना की कोणती केस चालू आहे. त्याने आपल्या वकिलाशी संपर्क साधला आणि त्याला आलेले मेसेज पाठवले. त्यावेळी रवीने आपल्या वकिलाला सांगितलं की जर मी हजर राहिलो नाही तर समोरच्या वकिलाने तुमच्या विरुद्ध आम्ही केस फाईल करू असं सांगितलेलं आहे. म्हणून रवीच्या वकिलांनी समोरच्या वकिलाने पाठवलेली माहिती बघितली असता तो बजाज फायनान्सचा वकील असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.

जो CNR नंबर होता, तो चुकीचा होता व cm नंबर हा पण वेगळाच होता आणि ती केस नंबर ही कोलकाता इथली दिसत होती. जर कोलकाताची ती केस होती, तर ती बोरिवली कोर्टामध्ये कशी दाखवण्यात आली होती? त्यात त्याला बोरिवली कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. पूर्ण केस नंबर व फायलिंग नंबरची चौकशी केल्यानंतर ती मुंबईतील केस दिसत नव्हती, तर कोलकाताची केस दिसत होती.

विरोधी वकील हे रवीला फोनवरून कोर्टात येण्यासाठी दबाव टाकत होते. ज्यावेळी कोर्टातून एखाद्या विटनेसला बोलवायचं असतं तेव्हा कोर्ट त्याला नोटीस, समन्स पाठवतो. नाही तर पोलिसांच्या मार्फत समन्स पाठवून बोलवलं जातं किंवा एखादा बँक कर्मचारी असेल तर बँक तसा आदेश त्या कर्मचाऱ्याला देते. पण, इथे मात्र बँकेचा आदेश आला नव्हता किंवा कोर्टाचे समन्स किंवा नोटीस आली नव्हती. मात्र समोरचा वकील हा सतत फोन करून त्याला कोर्टात हजर राहण्यासाठी सांगत होता. नाही तर तुम्हाला या केसमध्ये अडकवू अशी धमकी देत होता.

त्या वकिलाकडे रवीचा फोन नंबर, त्याचा घरचा ‌पत्ता, आधार कार्ड, पॅनकार्डपासून सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. रवीला मात्र आपण नेमकं काय केले तेच कळत नव्हतं. कारण १३८ ची केस होती. चेक बाऊन्सबद्दल केस असताना तिथला मॅनेजर कसा काय त्याच्यामध्ये अडकणार, हा मोठा प्रश्न होता. त्यात ही केस मुंबईमधली दाखवली जातच नव्हती. कारण बोरिवलीच्या बोर्डवर चेक केले असता ती कुठे केस दिसत नव्हती आणि बजाज फायनान्ससोबत कधीही रवीचा कोणताही संबंध आला नव्हता. कारण तो वकील बजाज फायनान्सचा होता आणि ती केस २२ मधली दाखवली गेली जात होती. जर बँकेचा काय प्रॉब्लेम असता तर बजाज फायनान्स यांनी डायरेक्ट बँकेला कनेक्ट केलं पाहिजे होतं पण ते रवीला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. मोठ्या षडयंत्रामध्ये रवीला अडकवण्याचा प्रयत्न हा भोंदू वकील करत होता. रवीला त्याच्या वकिलाने सल्ला दिला की, अगोदर जिथे ब्रांचमध्ये काम करत होतास, त्या मुंबईतल्या ब्रांचला या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती दे. त्यामुळे बँकही सावध होईल आणि त्या वकिलाचे जर जास्त फोन आले तर त्याच्याविरुद्ध एक पोलीस तक्रार करण्याचा सल्ला त्याला देण्यात आला आणि जोपर्यंत कोर्टाकडून कोणती नोटीस येत नाही तोपर्यंत कोर्टात हजर राहू नये असाही सल्ला वकिलांमार्फत देण्यात आला.

फ्रॉड हे सगळीकडे होत असताना आता न्यायालयाच्या केसेसद्वारेही फ्रॉड केलं जाऊ लागलेलं आहे आणि लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची नवीन युक्ती आता फ्रॉड सायबरवाले वापरू लागले आहेत. (सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment