जीवनगंध : पूनम राणे
आज मंगळवार आणि संकष्टीचा दिवस होता. हनुमान चौकातील गणेश मंदिर विविध रंगांच्या फुलांनी सजवले होते. आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मंदिराचे नुकतेच बांधकाम झाले होते. अनेक भक्तगणांच्या वर्गणीतून मंदिर उभारले गेले होते. बाप्पाचे मखर चांदीने मडवलेले होते. बाप्पाची लोभसवाणी बालमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
गेले आठवडाभर कार्यक्रमाची तयारी चालू होती. वास्तुशांतीच्या निमित्ताने आज सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे गेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज सकाळी पहाटेपासूनच भक्तांची येण्या-जाण्याची वर्दळ सुरू होती. मंदिराच्या बाहेर फुले, नारळ, प्रसाद विक्रेत्यांची दुकाने थाटलेली होती.
अनिका नावाची बारा वर्षांची मुलगी. इयत्ता आठवीत शिकत होती. एका टोपलीत जास्वंदीची फुले आणि २१ दुर्वांच्या जुड्या करून फुले विकायला बसली होती. ताजी टवटवीत जास्वंदीची फुले आणि नुकत्याच मळ्यातून तोडून आणलेल्या ताज्या टवटवीत दुर्वा अनिशाच्या टोपलीत होत्या. ती प्रेमाने सर्वांना बोलवत होती “आजोबा... दादा... काका... मावशी... या, या...” ताज्या-ताज्या दुर्वा घ्या. जास्वंदीची फुलं घ्या.
भक्तांची भली मोठी रांग लागली होती. काहींच्या हातात फुले होती, तर काहींच्या हातात काहीच नव्हते. या रांगेत सत्तर वर्षांचे आजोबा उभे होते. डोक्यावरील केस पिकले होते. चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. कुठेही पाठीला पोक आलेले नव्हते. स्वच्छ कपडे परिधान केले होते. त्यांचे लक्ष अनिकाकडे गेले. काय गं, पोरी... ‘दुर्वांची जुडी कशी दिलीस?” आणि ही जास्वंदीची फुलं!” आजोबा, “जास्वंदीची फुलं पाच रुपयाला दोन. आणि दुर्वांची जुडी पाच रुपयाला एक.”
आजोबा म्हणाले, मला एक दुर्वांची जुडी आणि दोन जास्वंदीची फुले दे. व्हय व्हय आजोबा देते की,” अगं पण तुझे नाव काय?” आजोबा, माझं नाव अनिका.” तुला शाळेत जायचं नाही का?” शाळेत जायचंय आजोबा, पण आज अंगारकी संकष्टी आहे, आज बाप्पाचा विशेष वार आहे. थोडे पैसे पण मिळतील आणि माझ्या हातून सेवा घडेल आणि शाळेचं विचाराल तर शाळा दुपारची आहे. १ वाजता. तोपर्यंत ही सगळी टोपली खाली होईल.
अरे वा! खूप छान काम तू करतेस बेटा!” आजोबा म्हणाले.आजोबा आम्ही त्या समोरच्या वस्तीत राहतो बघा. माझी माय दुसऱ्यांच्या घरची धुणी-भांडी करते.अन् बाप फुले विकायचा. पण सहा महिन्यांपूर्वी एका आजाराने माझा बा गेला बघा. माझ्या मायला थोडी पैशांची मदत होईल. म्हणून हे काम करते, आजोबा.”
आजोबांनी तिचे बोलणे ऐकून पाचशे रुपयांची नोट तिच्या हातावर ठेवली. ती म्हणाली,” आजोबा दहा रुपयांची फुलं घेतली एवढं कुठून आणायचं सुटं पैसं!.” आजोबा म्हणाले,” अगं, मला परत देऊ नकोस!” हे ठेव... हे पाचशे रुपये ठेव.”
नको, नको, तसं काय बी चालायचं नाही, मी फक्त दहा रुपये घेईन. अगं तुझ्या या लहान वयातलं कर्तृत्व पाहून मला आनंद झालाय” त्यामुळे तुला मी हे बक्षीस देतो असे समज.” अनिका म्हणाली, आजोबा तुमच्याकडे दहा रुपये सुट्टे नसतील तर राहू दे. नंतर द्या केव्हातरी.” आजोबा म्हणाले, तू कुठल्या शाळेत जातेस आणि कोणत्या वर्गात शिकतेस ?” अनिकाने आजोबांना शाळेचे नाव सांगितले.
देवदर्शन झाल्यानंतर आजोबा शाळेत पोहोचले.ते थेट लिपिक कक्षात आले. तिथे त्यांनी चौकशी केली.” अनिका आठवीत शिकणारी मुलगी. तिची फी काही बाकी आहे का?” गेले वर्षभर तिची फी भरलीच नव्हती. संगणक फी, सुविधा निधी, असे एकूण मिळून दोन हजार रुपये शिल्लक होते. आजोबांनी तिची सगळी फी भरली. अनिका दुपारी शाळेत आली.वर्गशिक्षिकेने ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी आहे अशा विद्यार्थ्यांची नावे वाचली. त्यामध्ये अनिकाचे नाव नव्हते. ती बाईंना म्हणाली,” बाई, माझी फी भरली गेली नाही, बाई म्हणाल्या,” आजच तुझी फी भरली आहे. कोणी?” मी तर भरली नाही. आई म्हणाली,” पुढच्या महिन्यात देईन.” बाई म्हणाल्या, थांब जरा,” मी लिपिकला विचारून तुला कळवते.”
तास संपल्यानंतर बाई लिपिक कक्षात गेल्या. लिपिकने सांगितले की, सकाळी एक आजोबा आले होते. त्यांनी तिची संपूर्ण वर्षाची फी भरली. बाईंनी अनिकाला शिक्षक कक्षात बोलवून घेतले आणि सांगितले,” ताबडतोब ओळखलं की, ती फी दुसरी तिसरी कोणी भरली नसून सकाळी आपल्याबरोबर जे आजोबा बोलत होते त्यांनीच ती भरली असावी. अनिकाने सारी घडलेली घटना बाईंना सांगितली.बाई म्हणाल्या,” अनिका देव असाच माणसाच्या रूपात आपल्याला मदत करत असतो. आपली फक्त त्याच्यावर मनापासून श्रद्धा हवी.
तात्पर्य : श्रद्धेला पुराव्याची गरज नसते.






