औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ‘अल्मोंट-कीड’ या बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’ हे विषारी रसायन आढळल्यानंतर तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनाने (डीसीए) या सिरपच्या विक्रीवर तत्काळ बंदी घातली आहे. कोलकाता येथील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (CDSCO) प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.
या तपासणीत बिहारमधील ‘ट्रिडस रेमेडीज’ कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच क्रमांक AL-२४००२ मधील सिरप भेसळयुक्त व जीवघेणा असल्याची समोर आले आहे. सामान्यतः ‘अल्मोंट-कीड’ सिरप मुलांमधील ॲलर्जी, हे फिव्हर, सर्दी, खोकला तसेच अस्थमाच्या उपचारासाठी डॉक्टरांकडून दिले जाते. मात्र, त्यामध्ये आढळलेले ‘इथिलीन ग्लायकॉल’ हे रसायन अत्यंत घातक असून, यामुळे किडनी निकामी होणे, मेंदूवर परिणाम होणे तसेच गंभीर विषबाधा होण्याचा धोका असतो. तेलंगणा डीसीएने राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना संबंधित बॅचचा साठा तत्काळ विक्रीतून काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पालकांनी आपल्या मुलांना हे औषध दिले असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. औषधांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे औषधनिर्मिती व गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
प्रशासनाचे पाऊल आणि आवाहन
राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना मेडिकल स्टोअर्स, वितरक आणि रुग्णालयांतून या विशिष्ट बॅचचा साठा त्वरित जप्त करण्याचे आणि विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्याकडे 'अल्मोंट-कीड' सिरपचा बॅच नंबर AL-२४००२ असेल, तर त्याचा वापर अजिबात करू नका आणि त्वरित औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना याची माहिती द्या.
तपासणीत काय आढळले?
तपासणीदरम्यान या सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण ठरावीक मानकांपेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, इथिलीन ग्लायकॉल हे एक औद्योगिक द्रावण आहे, ज्याचा वापर अँटी-फ्रीझ आणि कूलंट तयार करण्यासाठी केला जातो. हे केमिकल शरीरात गेल्यास किडनीचे नुकसान होऊ शकते, मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः मुलांसाठी ते प्राणघातक ठरू शकते.
कायदेशीर कारवाई सुरू
भेसळयुक्त औषधांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांच्या औषधांमधील अशा प्रकारच्या भेसळीमुळे देशातील औषध नियामक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने एक टोल-फ्री क्रमांक देखील जारी केला आहे, संशयास्पद औषधाची माहिती त्वरित देता येईल.






