सावंतवाडी (वार्ताहर) : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडी निर्धारीत वेळेत येण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने दिवा-सावंतवाडी रोड-दिवा (दैनिक) एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ आणि १०१०६ या गाड्यांच्या वेळा ‘प्रीपोन’ म्हणजेच अधिक लवकर करण्यात आल्या आहेत. सुधारित वेळापत्रक १२ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.
दिवा ते सावंतवाडी रोड धावणारी ट्रेन क्रमांक १०१०५ ही सध्या रोहा स्थानकावर सकाळी ९ ते ९.५ या वेळेत थांबत होती. सुधारित वेळापत्रकानुसार हीच गाडी आता रोहा स्थानकावर सकाळी ८.५० ते ८.५५ या वेळेत थांबणार आहे. त्यामुळे सकाळच्या प्रवासात वेळेची बचत होऊन प्रवाशांना पुढील प्रवास अधिक सुकर होणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी रोड ते दिवा मार्गावरील ट्रेन क्रमांक १०१०६ ही सध्या सायंकाळी ५.२० ते ५.२५ या वेळेत धावत होती. नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी आता १७.५ ते ५.१० या वेळेत धावणार आहे. संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकर गंतव्यस्थानी पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान, या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
‘मुंबई-करमाळी’चा मडगावपर्यंत विस्तार
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई)-करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२११५/२२११६) मडगाव जंक्शनपर्यंत चालविण्याचा कालावधी रेल्वे प्रशासनाने पुढे वाढवला आहे. ही गाडी करमाळीऐवजी मडगाव जंक्शनपर्यंत धावण्याचा निर्णय आता १२ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. कोकण व गोवा परिसरात पर्यटन, नोकरी, व्यवसाय तसेच वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. विस्तार केल्याने दक्षिण गोव्याच्या प्रवाशांना थेट फायदा होणार आहे.






