कथा: रमेश तांबे
एक होती मुंगी
नाव तिचं चिंगी
एकदा काय झालं
चिंगी खूपच दमली
पळून पळून खरेच थकली
मग तिने ठरवले
थोडे जरा थांबूया
थोडी विश्रांती घेऊया
फिरून फिरून जागा शोधली
जागा तिच्या मनात भरली
एका मोठ्या झाडाला टेकून
चिंगी राहिली, नुसतीच पडून
तिथेच तिने खाल्ला डबा
पाणी प्यायली घटाघटा
डोळे मिटले पटापटा.
दोन तास गेले उलटून
चिंगी राहिली तिथेच झोपून
मुंग्यांच्या गावात उडाला गोंधळ
चिंगी मुंगी कुठे गेली
शोधाशोध सुरू झाली
गावाची शिस्त तिने बिघडवली
मुंग्यांचे गाव कसे शिस्तीचे
मुळीच नसते गोंधळाचे
एका रांगेत चालणे पळणे
थकेपर्यंत काम करणे
ना कुणाशी बोलायचं
ना कुणाशी हसायचं
भरपूर काम, भरपूर कष्ट
मुंग्याच्या जगात यालाच महत्त्व
वाहून नेणे अन्नाचे कण
विश्रांती नाही दोन क्षण
गोंधळ नाही, गडबड नाही
शिस्त म्हणजे शिस्त
बाकी काही नाही...
मग काय...! चिंगी गायब झाली
अन् मुंग्यांची साखळी तुटली
काम थांबले चिंता वाढली
मुंगी राणीने दवंडी पिटवली
चिंगी मुंगीचा शोध घ्या
तिला लगेच पकडून आणा
तितक्यात कोणीतरी ओरडले
सापडली सापडली
चिंगी मुंगी सापडली
गावाच्या बाहेर डोंगराच्या जवळ
एकच आहे मोठा तलाव
तळ्याच्या काठावर वडाचे झाड
झाडाच्या खाली चिंगीचा पडाव
ऐकताच बोलणे सैनिकाचे
राणीने कागद लिहिले आदेशाचे
बांधून चिंगीचे दोरीने हात
हजर करा तिला दरबारात
मग मुंगी सैनिक तिथे गेले
त्यांनी झोपलेल्या चिंगीला पाहिले
हात तिचे दोरीने बांधले
तेव्हा चिंगीला आली जाग
सैनिकांचा आला तिला राग
म्हणाली सोडा मला सोडा
मी काही चोर नाही
हात बांधायचे कारणच नाही
चिंगीचा आवेश बघून सैनिक थांबले
चिंगीला त्यांनी मोकळे सोडले
मग चिंगी स्वतःच झाली हजर
राणीची पडली चिंगीवर नजर
राणी ओरडली ही बघा चिंगी चिंगी म्हणाली राणी सरकार
माफ करा मला...
खरेच सांगते राणी सरकार
मी तर बाई खूपच दमले
म्हणून थोडा वेळ आराम केला
एकटेपणाचा आनंद घेतला
रोज रोज धावायचं
सारखं सारखं काम करायचं
हेच का आपलं जीवन?
पण कधीतरी सुट्टी हवीच ना
आराम करावा, मजा करावी
आनंद लुटावा कधीतरी
ती माणसं बघा माणसं
मुंग्यांचं मोठं करतात कौतुक
म्हणे मुंग्या किती काम करतात
आपल्यावर ती पुस्तकं लिहितात
पण स्वतः मात्र सुट्ट्या घेतात
आयुष्याचा आनंद लुटतात!
चिंगी बोलत होती
बोलण्यात कळकळ होती
चिंगी बोलत असताना
राणी अवाक् झाली
तिच्या डोक्यात कल्पना आली
खरेच एखादी सुट्टी मिळाली
तर किती मजा येईल...
मग मुंगी राणीलाही
चिंगीचे म्हणणे पटले
राणीने नवे फर्मान काढले
प्रत्येकाला सुट्टी मिळेल
मौज करा मजा करा
मुलाबाळांत रमून जा
ते ऐकून मुंग्यांना नवलच वाटले
हे विपरित कसे घडले
तेव्हापासून मुंग्यादेखील
थोडा वेळ आराम करतात
आपल्या मुलाबाळांत रमतात
कुटुंबाबरोबर फिरायला जातात
जीवनाचा आनंद घेतात
मग मुलांनो,
आवडली ना कथा
मुंग्यांच्या जगातली
धावपळीची, कष्टाची
आयुष्यभरातल्या कामाची
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको
जीवनात आपल्या समतोल हवा.