Sunday, January 11, 2026

'जैश - ए - मोहम्मद'चा म्होरक्या महसूर अजहरचा ऑडिओ व्हायरल; सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली

'जैश - ए - मोहम्मद'चा म्होरक्या महसूर अजहरचा ऑडिओ व्हायरल; सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली

इस्लामाबाद : भारतविरोधी आक्रमक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हालचाली पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा एक ऑडिओ समोर आल्याचे वृत्त आहे. पण हा ऑडिओ मसूदचा आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. समोर आलेल्या ऑडिओतून जैश - ए - मोहम्मद अजूनही एकत्र असून हिंसक कारवायांचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत समाविष्ट असलेला मसूद अजहर पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असून, तेथूनच भारताविरोधी कट रचत असल्याचा आरोप दीर्घकाळापासून होत आहे.

हल्लेखोरांच्या संख्येबाबत मोठा दावा

या ऑडिओमध्ये मसूद अजहरने आपल्या संघटनेकडे मोठ्या प्रमाणावर आत्मघाती कारवाया करण्यास तयार असलेले दहशतवादी असल्याचे म्हटल्याचे सांगितले जाते. त्यांच्या संख्येचा अंदाज समोर आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडेल, असा दावा केल्याची माहिती आहे. हे कार्यकर्ते कोणत्याही क्षणी कारवाईसाठी सज्ज असल्याचा सूर या संदेशातून उमटला आहे.

ऑपरेशननंतरची प्रतिक्रिया?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अनेक तळांवर जोरदार कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत संघटनेचे अनेक सक्रिय सदस्य, तसेच मसूद अजहरचे काही जवळचे सहकारी आणि नातेवाईक मारले गेले होते.

यंत्रणांची सतर्क नजर

दरम्यान, जैशकडे प्रत्यक्षात किती आत्मघाती हल्लेखोर आहेत, त्यांची तयारी कोणत्या टप्प्यावर आहे आणि पुढील संभाव्य लक्ष्य काय असू शकतात, याचा सखोल आढावा भारतीय सैन्य घेत आहे. या संपूर्ण प्रकरणावर देशाच्या उच्चस्तरीय सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Comments
Add Comment