Saturday, January 17, 2026

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू

निवडणुकीच्या रणधुमाळीत बडतर्फ IAS पूजाच्या घरात घडली धक्कादायक घटना, पोलीस तपास सुरू
पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरात रविवारी मध्यरा‍त्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घरातल्या नोकरानेच घरामध्ये चोरी केली असा आरोप पूजाने केला आहे. या घटनेत पूजाचे आई-वडील बेशुद्ध अवस्थेत आढळून आले, तर स्वतः पूजा खेडकर जाड रश्शीने बांधलेल्या स्थितीत आढळली. बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या घरात कुटुंबासोबत काही नोकरही राहतात. त्यातील एक नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामासाठी आला होता. रविवारी मध्यरात्री या नोकराने दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर पूजा खेडकरचे हातपाय दोरीने बांधून घरातील मोबाईल फोन घेऊन तो फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर बांधून ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या पूजा खेडकर यांनी दारावरील कडीचा वापर करून स्वतःचे हात मोकळे केले आणि दुसऱ्या एका फोनवरून चतुःश्रृंगी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. महत्त्वाच म्हणजे, या घटनेनंतर अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आपली मानसिक अवस्था व्यवस्थित झाल्यानंतर तक्रार दाखल करू, असं पूजा खेडकर यांनी पोलिसांना सांगितलं आहे. मोबाईल व्यतिरिक्त घरातून आणखी कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत का, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी लाल दिव्याच्या वापरावरून आणि खोटी कागदपत्रं सादर करून नोकरी मिळवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर प्रकरणात आता या गंभीर घटनेमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment