Sunday, January 11, 2026

मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

मुंबईत उबाठाकडून  ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून मराठी आणि हिंदुत्व यावरून प्रचाराचे लोळ उडताना पहायला मिळत आहे. मात्र, हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. याउलट मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एरव्ही समाजवादी पक्ष आणि एमआयएम यासह काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्यात येत असली तरी भाजपने यंदाही एकाही उमेदवाराला संधी देत आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संधी देत त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपकडून हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असल्याने भाजपाकडून मुस्लिमांना किती संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, भाजपने यंदा एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही. या उलट उबाठा आणि शिवसेनेने प्रत्येकी ०९ मुस्लीम उमेदवाराला संधी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने ३३ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

समाजवादी पक्ष आणि एमआयएम हे पक्ष मुस्लिमांचे असल्याने या पक्षाकडून मुस्लीम उमेदवारांना सर्वाधिक उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीची चर्चा नसली तरी त्याखालोखाल काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवारी दिली जाते.

कोणत्या पक्षात मुस्लीम उमेदवार किती?

  • भाजप : ००
  • काँग्रेस : ३३
  • राष्ट्रवादी काँग्रेस : ११
  • शिवसेना : ०९
  • उबाठा ०९
  • वंचित : ००
  • मनसे : ०२
  • राष्ट्रवादी काँग्रेस शप ०२
Comments
Add Comment