Sunday, January 11, 2026

मतदार माहिती चिठ्ठयांचे आजपासून घरोघरी वाटप, आपल्याला मतदार चिठ्ठी मिळाली आहे का?

मतदार माहिती चिठ्ठयांचे आजपासून घरोघरी वाटप, आपल्याला मतदार चिठ्ठी मिळाली आहे का?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने येत्‍या गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यक माहिती असलेली मतदार माहिती चिठ्ठी (वोटर इंफॉरमेशन स्लिप) वितरणाची प्रक्रिया ९ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत निर्धारित कालावधीत मतदार माहिती चिठ्ठी वेळेत व अचूकरीत्या पोहोचावी, याकामी अत्यंत सूक्ष्म व प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. मतदारांनी समन्वय साधून आपली मतदार माहितीचिठ्ठी प्राप्त करून घ्यावी व गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले आहे.

राज्य निवडणूक आयोग, यांच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आदी माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार माहिती चिठ्ठ्या दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यामार्फत वितरीत करण्यात येत आहेत. या वितरण कार्यवाहीला शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ पासून सुरूवात झाली आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार माहिती चिठ्ठ्या पोहोचविण्याच्या या कार्यवाहीचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले.

विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (घनकचरा व्य्वस्थालपन) किरण दिघावकर, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्यासह परिमंडळ उप आयुक्त, प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्‍त, २३ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभाग व करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहायक अभियंता, अवेक्षक तसेच करनिर्धारण व संकलन विभागाचे निरीक्षक यांच्या समन्वयाने मतदार माहिती चिठ्ठी घरोघरी पोहोचविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील एक कोटीहून अधिक मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत निर्धारित कालावधीत मतदार माहिती चिठ्ठी वेळेत व अचूकरीत्या पोहोचेल, यासाठी अत्यंत सूक्ष्म, प्रभावी व काटेकोर नियोजन राबविण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी दिले आहेत.

मतदार चिठ्ठी अन्य व्यक्तींकडे न देता मतदार किंवा कुटुंबप्रमुखाकडे द्यावी. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ अवेक्षकांनी विभाग निरीक्षकांच्या समन्वयाने तसेच उपलब्ध कामगारांच्या सहाय्याने, संबंधित विभागातील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, बिगर शासकीय संस्था तसेच सामाजिक व अराजकीय संस्थांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत मतदार माहिती चिठ्ठी वितरणाबाबत आवश्यक सूचना द्याव्यात. या संपूर्ण कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल दररोज निवडणूक मुख्य कार्यालयाकडे सादर करण्यात यावा. तसेच या वितरण प्रक्रियेचे प्रभावी पर्यवेक्षण संबंधित प्रशासकीय विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता, पर्यवेक्षक व विभाग निरीक्षक यांनी करावे, असे निर्देश डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

काही मतदार विविध कारणास्तव उपलब्ध न झाल्यास, मतदानाच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदान केंद्राधिकारी, महानगरपालिका कर्मचारी यांच्याीमार्फत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करावे. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारची तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment