Saturday, January 10, 2026

‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ – संक्रमण काळाच्या पार्श्वभूमीवर १६ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान मुंबईत आयोजन

‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ – संक्रमण काळाच्या पार्श्वभूमीवर १६ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान मुंबईत आयोजन

मुंबई :  ज्योत (इंडिया) संस्थेच्या वतीने आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ चे आयोजन १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे संमेलन जैनाचार्य योगभूषणसूरीजी महाराज (७९वे आध्यात्मिक अधिपती) यांच्या पावन मार्गदर्शनाखाली आयोजित होत असून, सध्याचा जागतिक काळ हा ‘संक्रमण म्हणून ओळखला जातो. या काळात जगभरात अस्थिरता, विश्वासाचा ऱ्हास, मूल्यांची गळती आणि व्यवस्थात्मक बदलांची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत भारताकडे त्याच्या सभ्यतागत, नैतिक आणि आध्यात्मिक परंपरेवर आधारित मार्गदर्शनासाठी जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेतून उद्भवलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेतील १२ शाश्वत तत्त्वांवर हे संमेलन आधारित आहे. कुटुंबापासून समाज, राष्ट्र आणि जागतिक पातळीपर्यंत शाश्वत, न्याय्य आणि संतुलित व्यवस्था उभारण्यासाठी भारताचे ठोस योगदान मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हे संमेलन चौथ्या वर्षात पदार्पण करत असून, याआधीच्या आवृत्त्यांद्वारे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली आहे. ग्लोबल साऊथ व वेस्ट आशियातील २३ देशांच्या दूतावासांपुढे निष्कर्ष सादर करणे, आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून येरेवान डायलॉग २०२४ साठी निमंत्रण, तसेच संयुक्त राष्ट्रसंघात राजदूत रुचिरा कंबोज व UNGA अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्याशी संवाद ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत.

संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये:

• कायदा, शासन, भू-राजकारण, अर्थव्यवस्था, समाज आणि नैतिकता यांवर आधारित १० विषयक सत्रे • न्यायाधीश, राजनयिक, धोरणकर्ते, अभ्यासक व विचारवंत यांच्यासोबत गोलमेज परिषद चर्चा • २५,००० चौ. फूट क्षेत्रफळाचे संशोधनाधारित प्रदर्शन, ज्यात वसुधैव कुटुंबकम् ची १२ तत्त्वे सादर केली जातील • भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवासाठी विशेष कायदेशीर प्रदर्शन • विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्ट, मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN), स्ट्रीट प्ले, नालंदावाद यांसारख्या उपक्रमांचे आयोजन • दररोज पॉडकास्ट सत्रे – शिक्षण, पर्यावरण, माध्यमे, प्रशासन, उद्योजकता आदी विषयांवर संवाद

उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये:

माजी सरन्यायाधीश न्या. बी. आर. गवई, माजी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश न्या. बी. एन. श्रीकृष्णा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयल,राज्य मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. श्री चंद्रशेखर, माजी संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय राजदूत रुचिरा कंबोज, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातनाम विचारवंतांचा समावेश आहे.

संस्थात्मक भागीदार:

गीताार्थ गंगा, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, इंडिया फाउंडेशन, नालंदा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, गोखले अर्थशास्त्र संस्था, डी. वाय. पाटील विद्यापीठ, निर्मा लॉ युनिव्हर्सिटी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, बॉम्बे बार असोसिएशन आदी अनेक नामांकित संस्था या उपक्रमास पाठबळ देत आहेत.

संयोजकांच्या मते, हे संमेलन भारताच्या सभ्यतागत मूल्यांवर आधारित १२ सूत्रीय मार्गदर्शनाद्वारे नव्या जागतिक व्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरेल आणि नागरिकांना समकालीन कायदेशीर, सामाजिक व नैतिक प्रश्नांवरील उपाय अनुभवण्याची संधी देईल.

Comments
Add Comment