Sunday, January 11, 2026

उबाठा म्हणते मुंबईत ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डींग टँक्स बांधणार

उबाठा म्हणते मुंबईत ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डींग टँक्स बांधणार

पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्यांची उभारणी

वचननाम्याचा पंचनामा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने हिंदमाता, मिलन सब वे आदी ठिकाणी पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्या बनवून पंपिंग द्वारे त्या पाण्याचा निचरा केला जात आहे. अशाचप्रकारे आता अंधेरी सब वेच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत पाण्याची टाकी बनवण्यासाठीचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्या आणि पंपिंग स्टेशन बनवण्याची कामे काही प्रमाणात पूर्ण झाली आहे तर काही कामे प्रस्तावित असतानाच उबाठाने प्रभावी पूर नियंत्रण व्यवस्था उभारण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डींग टँक्स बांधणार असल्याची घोषणा करत एकप्रकारे महापालिकेने हाती घेतलेल्या योजनेला पुढे रेटत मुंबईकरांना गाजरे दाखवण्याचे काम केले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेच्यावतीने मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा प्रसिध्द केला आहे. या वचननाम्यामध्ये पूर नियंत्रणाबाबत उबाठाने असे म्हटले आहे की प्रभावी पूर नियंत्रण व्यवस्था उभारण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डींग टँक्स बांधणार . परंतु, हिंदमाता येथील परिसरात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद नवलकर उद्यानात भूमिगत टाक्या बांधून ओहोटीच्या वेळी यातील पाणी पर्जन्य जलवाहिनीतून समुद्रात सोडण्याचे काम केले जाते आणि भरतीच्या वेळी तुंबलेले पाणी पंपाद्वारे भूमिगत टाक्यांमध्ये वळते केले जाते. हिंदमाता परिसरातील या यशस्वी प्रयोगानंतर मिलन सब वे आणि वांद्रे पश्चिम भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठीही अशाप्रकारचा प्रयत्न केला जात आहे.तसेच अंधेरी सब वेच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाकी बांधण्यासाठी जागेचा शोध घेण्यात येत आहे.

ब्रिटानिया, इर्ला, लव्हग्रोव्ह आणि क्लीव्हलँड येथील पंपिंग स्टेशन उभारुन मुंबईकरांना दिलासा दिला आहे. तसेच आता उपनगरात मोगरा तसेच माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी तेथील जमिनींशी संबंधित कायदेशील परवानगी केंद्राकडून येणे प्रलंबित आहे. ही परवानगी मिळवून लवकरात लवकर ही दोन पंपिंग स्टेशन उभारणार असल्याची घोषणा केली. परंतु मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनबाबत असलेल्या जागेचा तिढा संपुष्टात येत यासाठी न्यायालयात ४५ कोटी रुपये भरण्यात आले आहे. याची परवानगीही प्राप्त झाल्याने याच्या कामाला आता गती मिळणार आहे. तर माहुलमध्ये पंपिंग स्टेशनसाठी जागेचा तिढा सुटलेला असून मिठागर आयुक्तांच्या मंजुरीने महापालिकेला ही जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रियाही शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे यासाठीच्या कामाला आता सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या पंपिंग स्टेशनसाठी परवानगीही प्राप्त होत असल्याने यांच्या कामालाही सुरुवात केली जाणार असल्याने उबाठाला यासाठी कोणतीही मेहनत घेण्याची वेळ येणार नाही. उलट साडेतीन वर्षे जर सोडली तर पूर्वीच्या १४ ते १५ वर्षांमध्ये उबाठाला सत्ता असूनही या पंपिंग स्टेशनची उभारणी आणि जागेचा तिढा सोडवता आलेला नव्हता.

मिठीनदीसह सर्व नद्यांची स्वच्छता

मिठी, ओशिवरा, पोयसर, दहिसर या चार नद्या आणि माहुल खाडी यांची शास्त्रीय पध्दतीने स्वच्छता करून पर्जन्यजल व्यवस्था अधिक सक्षम बनवणार असल्याचे वचन उबाठाने दिली आहे. विशेष म्हणजे मिठी नदीसह यासर्व नद्यांचे खोलीकरण आणि संरक्षक भिंतीच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या नद्यांमधील सांडपाणी निचरा करणाऱ्या वाहिन्या वळत्या करून त्यातील मलप्रवाह रोखणे आदींसाठीचे काम प्राधान्याने मिठी नदीपासून सुरु झाले आहे. त्यामुळे भविष्यात मिठी नदीसह दहिसर, पोयसर, वालभट ओशिवरा आदी नद्या पर्यावरणपुरक दिसण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने उपाययोजना आणि संबंधित कामे हाती घेण्यात आली आहे. जी कामे महापालिकेच्यावतीने सुरु आहेत, तीच कामे दाखवून उबाठा मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment