देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र, हे स्फोट अवैधरीत्या करण्यात येत असल्याचा आरोप मारळ येथील ग्रामस्थांनी केला असून, या स्फोटांना विरोध दर्शवला आहे. ठेकेदार व त्यांना सुरुंग स्फोटाची परवानगी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी व सुरुंग स्फोटाची साधने जप्त करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत मारळ ग्रामस्थांनी देवरुख तहसीलदार व देवरुख पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. मार्लेश्वर देवस्थान येथे श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी पुलाचे काम सुरू आहे. हे काम करताना ठेकेदाराकडून नदीपात्रामध्ये सुरुंग लावले जात आहेत. आजपर्यंत ५० ते ६० सुरुंगाचे स्फोट करण्यात आले. मंदिराच्या पायथ्याशी होत असलेल्या सुरुंग स्फोटामुळे मंदिर परिसरातील अंगण व बांधकामांना तडे जात आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.