ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
'ठाकरेंचा बालेकिल्ला ? याच भागातून आमचे उमेदवार तीन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी'
January 10, 2026 09:05 PM
मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वरळीत प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे आणि उबाठा गटावर तिखट शब्दांत टीका केली. "हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे असे म्हणण्याची आता गरज उरलेली नाही, कारण आम्हीही तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो," असे म्हणत त्यांनी सुरुवातीलाच आव्हान दिले.
बीडीडी चाळ आणि विकासाचा मुद्दा
वरळीतील कळीचा मुद्दा असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून राणेंनी आदित्य ठाकरेंना घेरले. "वडील मुख्यमंत्री होते आणि मुलगा मंत्री, तरीही बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला न्याय मिळाला नाही. हा प्रश्न सोडवण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत," असा आरोप त्यांनी केला. तसेच, बीडीडी चाळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हिंदुत्व आणि 'हिरवे साप'
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा संदर्भ देत नितेश राणे म्हणाले की, "बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज त्यांच्या पक्षात बॉम्बस्फोटाच्या आरोपींना आणि 'हिरव्या सापांना' प्रवेश दिला जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी अशा लोकांना ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढले असते."
अमित आणि आदित्य यांच्यावर टीका
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, "आम्ही एकत्र आलो नाही तर हे दोन्ही भाऊ बेरोजगार होतील, या भीतीनेच ते एकत्र आले आहेत." तसेच, मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घसरण्याला सध्याची सत्ताधारी यंत्रणा जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.
अस्तित्वाची लढाई आणि थेट आव्हान
"ही निवडणूक केवळ मतांची नसून आपल्या अस्तित्वाची आहे. जर यांची सत्ता आली तर मुंबईतील मंदिरे सुरक्षित राहणार नाहीत," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. "आमचा उमेदवार निवडून आला तर विजयाचे फटाके वाजवायला मी स्वतः येणार आणि एक फटाक्याची माळ 'मातोश्री' (कलानगर) समोरही लावणार," असे थेट आव्हान त्यांनी दिले.