Saturday, January 10, 2026

मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; प्रभाग क्रमांक १७ - अ मधून निलेश भोजने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; प्रभाग क्रमांक १७ - अ मधून निलेश भोजने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७-अ मधील राजकीय चित्र आता बदलताना दिसत आहे. भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य ठरवला असून, त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान भोजने यांच्या मालमत्तेशी संबंधित कथित अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरोधात भोजने यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमेदवारी नाकारताना कायदेशीर बाबींचा पुरेसा विचार करण्यात आलेला नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संबंधित आदेशाला स्थगिती दिली. तसेच भोजने यांचे नाव उमेदवारांच्या अधिकृत यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले.

या निकालाचा थेट परिणाम प्रभाग १७-अ मधील राजकीय गणितांवर होणार आहे. भाजपची उमेदवारी धोक्यात आल्यानंतर पक्षाने पर्यायी उमेदवारांचा विचार सुरू केला होता. मात्र, आता थेट भाजप उमेदवार पुन्हा मैदानात आल्याने शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, न्यायालयीन स्थगिती हटवल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून ठरलेल्या तारखेनुसार येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ९५६ अर्जांपैकी ८३९ अर्ज वैध ठरले आहेत, तर ११७ अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत. विभागनिहाय पाहता घणसोली आणि नेरूळ भागात सर्वाधिक अर्ज बाद झाले असून वाशी विभागात ही संख्या अत्यल्प आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा