महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. एका भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून, यामध्ये पीक-अप व्हॅन, गॅस टँकर आणि कारसह सात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
काय घडलं नेमकं ?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात ज्या घाटात झाला, तो भाग सुमारे दोन किलोमीटरचा तीव्र उताराचा आहे. उतारावरून खाली येत असताना एका वेगाने येणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले किंवा चालकाचे नियंत्रण सुटले. या ट्रकने समोर असलेल्या आयशर ट्रकला जोरात धडक दिली. धडकेचा वेग इतका मोठा होता की, आयशर ट्रकने समोरील कारला उडवले. त्यानंतर एकामागोमाग एक कार, पीक-अप व्हॅन आणि गॅस टँकर एकमेकांवर आदळले. या विचित्र अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मानपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी लोकेंद्र हेहोर यांनी दिली आहे. गॅस टँकरलाही धडक बसली होती, मात्र सुदैवाने कोणतीही गळती झाली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
अयोध्या : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात आज एका संशयास्पद घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरातील अत्यंत ...
महामार्ग काही काळ बंद
अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाकडून तातडीने क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ब्रेक निकामी झाल्याने...
मुंबई-आग्रा महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी झालेल्या सात वाहनांच्या भीषण अपघातामागे तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले आहे. इंदूरहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडला. मात्र, ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी टाळली आहे. "मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला" ट्रक चालक मोहम्मद आरिफने या थरारक अनुभवाबद्दल माहिती देताना सांगितले की, "उतारावर ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. महामार्गावर एका बाजूला मोठी वाहतूक कोंडी होती आणि तिथे काही लहान मुले आणि कार उभी होती. त्यांना वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जर मी ट्रक तिथे घातला असता तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे मी ट्रक दुसऱ्या बाजूला वळवला आणि समोरच्या ट्रेलरला धडक दिली. स्वतःचा आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले." राजस्थानमधील कार चालक रघुवीर यांनी या अपघाताची भीषणता सांगितली. "आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो होतो. त्याच वेळी दुसऱ्या लेनमधून एक अनियंत्रित ट्रक वेगाने आला आणि त्याने एका पिकअप ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेमुळे पिकअप ट्रक उलटून थेट आमच्या कारवर पडला. कारमध्ये आम्ही दोघे होतो, पण सुदैवाने आम्हा दोघांनाही इजा झाली नाही. हा एक चमत्कारच होता," अशा शब्दांत त्यांनी आपला अनुभव व्यक्त केला. या अपघातात पिकअप ट्रकचा चक्काचूर झाला असून कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, मोहम्मद आरिफ या ट्रकचालकाच्या एका धाडसी निर्णयामुळे या भीषण अपघातात कोणाचाही जीव गेला नाही, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एअरबॅग्ज ठरल्या 'देवदूत'...
एका कारमधील चार लहान मुलांसह एकूण आठ प्रवासी केवळ एअरबॅग्ज वेळेवर उघडल्यामुळे मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले आहेत. या भीषण धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, एकालाही साधी जखम झालेली नाही. उज्जैन येथील रहिवासी असलेले जयदीप हे आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जात होते. अपघाताचा थरार सांगताना त्यांनी सांगितले की, "महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने मी माझी गाडी सुरक्षितपणे सर्व्हिस लेनवर उभी केली होती. जेमतेम दोन मिनिटे झाली असतील, इतक्यात मागून एक अनियंत्रित ट्रक वेगाने आला आणि त्याने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आमची गाडी पुढच्या वाहनांवर जाऊन आदळली." जयदीप यांच्या गाडीत चार लहान मुलांसह एकूण आठ लोक होते. ट्रकने दिलेल्या धडकेमुळे गाडीचा चक्काचूर झाला. "गाडीला धडक बसताच क्षणात सर्व एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती जखमी झाली नाही. जर एअरबॅग्ज नसत्या, तर आज मोठे संकट ओढवले असते," अशा शब्दांत त्यांनी आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचे आभार मानले.





