Sunday, January 11, 2026

मी बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक! भाग ३

मी बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक! भाग ३

मिलिंद रघुनाथ पोतनीस

‘मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. होते आहे, असे लक्षात आले, तर मी माझी शिवसेना बंद करीन. आज जो तुम्हाला मानसन्मान मिळतो आहे, तो हिंदुत्वामुळे, भगव्या झेंड्यामुळे, एवढे लक्षात ठेवा. शिवसेनेत कोणतीही लोकशाही नाही. ऑर्डर इज ऑर्डर.’

हुमत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला मिळाले आणि आमची घोर निराशा झाली. आमच्यासाठी दळभद्री कमळाबाई असून नसल्यासारखी होती.

या निराशेतून शिवसैनिक बाहेर यायच्या आत एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यांमुळे आम्ही आणखी निराशेच्या गर्तेत जाऊ लागलो. याच काळात एका मुलाखतीत बाळासाहेबांनी ‘मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. होते आहे, असे लक्षात आले, तर मी माझी शिवसेना बंद करीन. आज जो तुम्हाला मानसन्मान मिळतो आहे, तो हिंदुत्वामुळे, भगव्या झेंड्यामुळे, एवढे लक्षात ठेवा. शिवसेनेत कोणतीही लोकशाही नाही. ऑर्डर इज ऑर्डर.’ म्हणून ठणकावून सांगितलं होतं.

कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा उजवा हात, ज्यांना साहेबांनी मुख्यमंत्री बनवले, ते नारायण राणे उर्फ दादा यांनी जुलै २००५ मध्ये साहेबांच्या डोळ्यांदेखत १० आमदारांना सोबत घेऊन शिवसेना सोडली. त्यांनी ४ जुलै २००५ रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. नंतर लगेचच ऑगस्ट २००५ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तरीही त्यांनी साहेबांबद्दल कधीही एक वावगा शब्द उच्चारला नाही. शिवसैनिक कसा असावा याबाबतीत ते आदर्श होते. त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी पटेनासं झालं होतं असं ते सांगायचे. साहेबांनी जर उद्धवजींची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली असेल, तर त्यांच्याशी पटवून घ्यावेच लागेल, ही आम्हा शिवसैनिकांची ठाम धारणा होती. वाघाशी पटतं, पण वाघाच्या बछड्याशी पटत नाही, ऐसा कैसा चलेगा नारायणराव? ‘पटत नाही’ या सबबीखाली तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसच्या वळचणीला गेलात की नाही? खरं सांगा नारायणराव, असाच सवाल प्रत्येक शिवसैनिक त्यांना विचारत होता. पुढच्या काळात त्यांची शिवसैनिकांनी उडवलेली टरही, आम्ही आमच्या परीने आत्मसात केलेली साहेबांची ‘ठाकरी शैली’ होती.

पण, नारायणरावांचं पक्षातून बाहेर पडणं शिवसेनेला जबर दणका होता एवढं खरं. आम्ही शिवसैनिक आतून हादरलो होतो. महाराष्ट्रात युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री जोशी सरांची १ वर्ष आधीच गच्छंती करून बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केला होता. त्याचे पांग याने असे फेडले होते. त्या धक्क्यातून आम्ही सावरतो न सावरतो, तोच मार्च २००६ मध्ये ज्याला साहेबांनी अंगाखांद्यावर खेळवला होता, जो पक्षात साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता, ज्याने स्वतः उद्धव साहेबांचे कार्याध्यक्ष म्हणून नाव सुचवले होते, ते राजसाहेब शिवसेना सोडून बाहेर पडले. सोबत बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार, राम कदम, प्रवीण दरेकर यांच्यासारखे एकापेक्षा एक बिनीचे शिवसैनिक घेऊन ते बाहेर पडले. पण, ही केवळ पक्षातील फूट नव्हती, ठाकरे कुटुंबातील फाटाफूट होती आणि ती आम्हां शिवसैनिकांच्या भयंकर जिव्हारी लागली.

राजसाहेबांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ नावाचा नवा पक्ष काढला. नव्या पक्षाच्या नावात ‘सेना’ होतीच. निशाणी घेतली होती ‘रेल्वेचे इंजिन’. म्हणजे, एकेकाळी शिवसेना ज्या निवडणूक चिन्हावर आपले उमेदवार अपक्ष म्हणून लढवत असे तेच रेल्वे इंजिन! प्रत्येक ठिकाणी त्यांना आमच्या सेनेची पुण्याई हवी होती. हा होता आमच्या साहेबांचा आणि सेनेचा करिष्मा. भगवा सोडून त्यांनी एक नवा चट्टेरीपट्टेरी रंगीबेरंगी झेंडा घेतला. आम्ही तो झेंडा बघून जाम हसलो होतो. ‘जय मनसे, दे दोनशे’ ही त्यांच्या खंडणीखोर मनसेसैनिकांची ओळख आणि औकात सांगताना आमची हसून हसून मुरकुंडी वळायची. आम्ही एकमेकांना टाळ्या द्यायचो. पण, उद्धव साहेबांशी न जमल्यामुळे मी पक्ष सोडत आहे, या राजसाहेबांच्या आरोपाने आम्ही भयंकर व्यथित झालो होतो. ‘विठ्ठल’ काय, ‘बडवे’ काय… अरे दळभद्रयांनो, जमत नाही म्हणजे काय? शिवसेनेत राहायचं आहे तर उद्धव साहेबांची जमवून घ्यावंच लागेल. बाळासाहेबांची निवड आहे ती. शिवसेनेत तुमची आवडनिवड चालणार नाही, असा आमचा स्पष्ट पवित्र होता. राहिले ते मावळे, गेले ते कावळे... गेले उडत.

मात्र कालपर्यंत जे आमच्या मांडीला मांडी लावून बसत होते ते मनसे सैनिक आज शत्रूसारखे वागू लागले. त्यांच्या मनात वैराची भावना होती. प्रत्येक ठिकाणी आपण शिवसेनेपेक्षा वरचढ आहोत, हे दाखवण्याची ईर्षा होती. पण ते कसं शक्य होतं? शेवटी आमचे साहेब ते साहेब आणि शिवसेना ती शिवसेना. दुपारी १२ वाजता उठणारे पक्षप्रमुख आम्हाला कशी टक्कर देऊ शकणार होते? असा आमचा साधा सोपा सरळ हिशोब होता.

पण पुढच्याच वर्षी २००७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा ‘महापौर आमचाच’ झाला. आम्हाला ८३ जागा मिळाल्या. (गेल्या वेळेपेक्षा १३ कमी असं म्हणणारे अडाणी भाजपवाले, आपल्या ७ जागा कमी झाल्या आहेत हे कधीच सांगत नाहीत.) मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले. पण आमचे १७ नगरसेवक पाडण्याचे काम मात्र त्यांनी चोखपणे बजावले. महापौरपदी शिवसैनिक बसवण्यासाठी आम्हाला कमळाबाईचा पदर धरावा लागला, याचे अतोनात दुःख झाले. पण युती असल्यामुळे कमळाबाईला आमच्या मागोमाग फरफटत यावं लागलं. शेवटी ‘मुंबई आमचीच’ याच्यावर मात्र शिक्कामोर्तब झालं.

त्यातच २००७ सालीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. भाजपप्रणित आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून भैरोसिंह शेखावत हे उमेदवार असताना देखील केवळ मराठीच्या मुद्द्यावर साहेबांनी काँग्रेसप्रणीत यूपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना मतदान करण्याचे आदेश शिवसेनेच्या खासदारांना आणि आमदारांना दिले. साहेबांच्या मराठी माणसावरच्या खऱ्याखुऱ्या आत्मीयतेमुळे आम्ही भारावून गेलो होतो. शिवसेनेने भैरोसिंह शेखावत यांना मते न दिल्याचा राग अजूनही भक्ताडांच्या मनात आहे. म्हणे, मातोश्रीवर पेट्या पोचल्या असणार! असले थर्ड क्लास शेरे मारतात. अरे, कोण कुठला राजस्थानचा भैरोसिंह शेखावत? प्रतिभाताई पाटलांसारखा शत-प्रतिशत मराठी उमेदवार असताना शिवसेनेने मराठी बाणा बाळगायचा की युतीधर्म? आमच्यासाठी ‘मराठी बाणा’ सर्वोतोपरी होता.

आता २००९ची लोकसभा आणि विधानसभा यांची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. २००९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रातली सत्ता तर दूर राहिली, पण महाराष्ट्रात मात्र आम्हीच ‘मोठा भाऊ’ असल्याचं सिद्ध झालं. २२ जागा लढवून आम्ही ११ जिंकल्या. २५ जागा लढलेल्या भाजपच्या ९ जागा आम्ही निवडून आणल्या. (भक्ताडं आता मात्र स्ट्राइक रेट काढायला तयार नव्हती.) डॉक्टर मनमोहन सिंह पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या गादीवर बसले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही लोकसभा निवडणूक लढवली होती, जिथे युतीत भाजपचे अमराठी उमेदवार होते तिथे. म्हणजे, भय्या, गुजराती किंवा मद्रासी. तिथे गनिमी काव्याने जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल, तर गनिमी कावा करून आम्ही त्याला मते दिली.

आता एक आशा होती महाराष्ट्र विधानसभा. पण तिथेही घात झाला.

१६० जागा लढवून आमचे ४४ आमदार निवडून आले, तर कमळाबाईने ११९ जागा लढवल्या. आम्ही त्यांचे ४६ आमदार निवडून आणले. विरोधी पक्षनेतेपद दळभद्री कमळाबाईकडे गेले. एकनाथ खडसे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले. आम्हाला फक्त २ जागा कमी पडल्या. आम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगणारी कमळी आज डोक्यावर पदर घेऊन आमच्यासमोर तोरा मिरवत होती.

आधीच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या रामदासभाई कदम यांना भाजपला मोठ्या मनाने विरोधी पक्षनेते पद देता आलं असतं, हे देखील सांगण्याची सोय राहिली नाही. कारण आमच्याच आतल्या घातक राजकारणाने रामदासभाईंचा गुहागर मतदारसंघातून पराभव केला होता. (रामदासभाईंना पाडण्यासाठी मातोश्रीवरून चोख व्यवस्था करण्यात आली होती, हे काही भाजपवाले अगदी शेरलॉक होम्सच्या तोऱ्यात सांगतात.) शिवाय नव्याने स्थापन झालेल्या मनसेचे नव्याच्या नवलाईमुळे १३ आमदार निवडून आले. पण, आमचे २६ आमदार पाडण्याचे काम मात्र त्यांनी इमानेइतबारे बजावले होते. त्यांना मिळालेली मतं कोणाची होती? आमचीच ना? घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात ते असे!

साहेबांचे नातू आदित्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आणि साहेबांच्या आशीर्वादानं २०१० साली ‘युवा सेना’ ही तरुणांच्या समस्या, विचार आणि हक्कांसाठी लढणारी एक प्रभावी युवा संघटना सुरू झाली. युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये मराठी तरुणांचा भरणा होणार होता. (नेहमीप्रमाणे भक्तांच्या कल्पनाशक्तीला ऊत आला होता. काय तर म्हणे, तिसऱ्या पिढीची सोय लावून दिली. ज्यांच्या पुढच्या पिढीकडे कर्तृत्व नसतं, त्यांची सोय लावून द्यावी लागते. उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांच्या कर्तृत्वाबद्दल प्रश्नच नव्हता. कारण बाळासाहेबांचे पुत्र आणि नातू आहेत ते. कर्तृत्ववानच असणार ना!)

त्यावेळी साहेबांनी ‘जे हिजडे असतात ते सोनिया गांधी समोर झुकतात,’ म्हणून काँग्रेसवाल्यांची अक्षरशः अब्रू काढली होती. त्यांचा हा डायलॉग खूप गाजला. आजही गाजतो आहे. पण त्यावेळी काँग्रेसच्या हिजड्यांवर आम्ही खूप हसलो होतो. बाळासाहेबांच्या ठाकरे शैलीवर जाम खूश झालो होतो.

२०१२ चं वर्ष. भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होती. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेचे माजी सभापती पीए संगमा होते. काँग्रेस प्रणीत यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ‘मातोश्री’ वर आले. व्यापक राष्ट्रहित लक्षात घेऊन साहेबांनी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला. कारण दोन्ही उमेदवार अमराठी होते. मग त्यातल्या त्यात प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदासाठी अत्यंत सुयोग्य उमेदवार आहेत, असं साहेबांना वाटलं. प्रणव मुखर्जी यांना ‘मातोश्री’वर शरद पवार घेऊन आले होते. शरद पवार आणि साहेबांचे वैयक्तिक संबंध मैत्रीचे होते. पण, राजकीय वैमनस्य भयंकर होतं. साहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत ‘शरद पवार जरी मित्र असला, तरी नीच प्रवृत्तीच आहे’ या शब्दात शरद पवारांची राजकीय औकात दाखवून दिली होती.

तरीही आता आम्हाला अंध:कार दिसत होता. केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, मुंबई महापालिकेत आमची सत्ता होती. पण, बाळासाहेबसुद्धा दिवसेंदिवस क्षीण होत चालले होते. त्यांना वृद्धत्व जाणवत होते. अजूनही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत होता. एखाद्या पक्षाने, दरवर्षी एका ठराविक दिवशी, एकाच जागी वर्षानुवर्षं सलग सभा घेणे हा जागतिक विक्रम असावा. त्यामुळे आम्हा शिवसैनिकांसाठी शिवाजी पार्क हे ‘शिवतीर्थ’ झालं होतं आणि ‘मातोश्री’ हे तीर्थक्षेत्र!

२०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकांचं वर्षदेखील आमच्यासाठी मुंबई महापालिका म्हणजे ‘इज्जत का सवाल.’

साहेब शरीर साथ देत नसल्यामुळे प्रचाराच्या स्थितीत नव्हते. उद्धव साहेबांनी प्रचाराची धुरा एकहाती समर्थपणे सांभाळली. आमचे ७५ नगरसेवक निवडून आले आणि ‘कमळी’चे ३१ निवडून आणले. ‘मोठा भाऊ’ म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. आमच्याच मतांमध्ये वाटमारी करून जगणारे बांडगुळ ७ वरून २८ वर पोचले होते. आमच्या २८ जागा इमानदारीत पाडून. पण महापौर मात्र आमचाच झाला. मुंबई महापालिका ठाकरेंची, शिवसेनेची, मराठी माणसाची आहे याची ग्वाही मिळाली.

आणि आला २०१२ सालचा दसरा मेळावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतः या दसरा मेळाव्याला येऊ शकले नाहीत. मात्र चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी आम्हा शिवसैनिकांना संबोधित केलं. ‘मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल, तर विसरून जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही. उद्धव व आदित्यला मी लादलेलं नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या’ शिवसेनाप्रमुखांनी असं भावनिक आवाहन दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे जमलेल्या शिवसैनिकांना केलं, तेव्हा उपस्थित तमाम शिवसैनिकांचं हृदय हेलावून गेलं. ‘उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांची साथ कधीच सोडणार नाही,’ साहेबांना असं मनोमन वचन देऊन मी सभेतून परतलो. आणि आजही मी ते वचन पाळतो आहे.

पण शेवटी काळाने घाला घातलाच. १७ नोव्हेंबर २०१२. दिवसा सूर्य मावळला. घनघोर अंधःकार पसरला. आयुष्यभर मराठी माणसासाठी देह झिजवलेल्या साहेबांनी ८६व्या वर्षी या दुनियेला ‘जय महाराष्ट्र’ केला. मी धाय मोकलून रडलो. अख्खी मुंबई, उभा महाराष्ट्र, अवघा देश हमसून हमसून रडला. साहेब गेले तेव्हा उत्स्फूर्तपणे जी मुंबई बंद झाली होती ती आजपर्यंत कोणी पाहिली नव्हती. माझ्या आजोबांच्या तोंडून लोकमान्य टिळक गेले, तेव्हा १ ऑगस्ट १९२० चे ‘मुंबई बंद’चे वर्णन ऐकले होते. तशीच मुंबई बंद झाली. अवघा देश शोकाकुल झाला.

त्यानंतर शिवसेनेत सुरू झालं, उद्धव साहेबांचं नवीन युग!

बाळासाहेबांच्या वियोगाच्या दुःखातून बाहेर पडेपर्यंत २०१४ च्या लोकसभा निवडणूका येऊन ठेपल्या. बाळासाहेबांच्या पश्चात देखील सेना-भाजप युती अभंग राहिली होती. स्व. बाळासाहेबांचा वारसा उद्धव साहेब तितक्याच समर्थपणे सांभाळू शकतील का? अशी फुकटची चिंता भाजपचा भक्तगण करत होता. २०१४ लोकसभा निवडणुकांचे निकाल आले. आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात प्रचंड बहुमत लाभले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. महाराष्ट्रात आम्ही २० जागा लढवून आमचे १८ वाघ तर भाजपचे २४ पैकी २३ उमेदवार निवडून आणले. भाजपने कितीही बाता मारल्या तरी महाराष्ट्रात ‘ठाकरे ब्रँड’चीच जादू चालली होती, हे प्रत्येक शिवसैनिकाचं अंतर्मन सांगत होतं. कमळाबाईला २८२ जागा मिळाल्या असल्या, तरी त्या शिवसेना, अकाली दल, तेलुगू देसम यांच्यासारख्या मित्र पक्षाच्या आधारावरच मिळाल्या होत्या, हे निर्विवाद सत्य आहे. पण ही खडूस कमळाबाई ते कधीच मान्य करत नाही. ते ‘मोदी ब्रँड’चं तुणतुणं घेऊन बसले होते. असो. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा शिवसेनेचे वाघ डरकाळ्या फोडू लागले आणि पाठोपाठ २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागल्या. पण गोचीडासारख्या रक्त पिणाऱ्या कमळाबाईने घात केला. सत्तेच्या हव्यासापायी अजून जागा हव्यात, अजून जागा हव्यात, म्हणून शेवटपर्यंत जागा वाटपाचा घोळ घातला. आम्हाला किमान १५१ जागा हव्या होत्या. आमचा हक्कच होता तो. २००९ च्या विधानसभेला आम्ही १६० जागा लढवल्या होत्या. ‘होय नाही, होय नाही’ करत कमळाबाईने अगदी शेवटच्या क्षणी युती तोडली. उद्धवसाहेब म्हणाले, गेलात उडत. २५ वर्षांच्या संसाराचा घटस्फोट झाला. आम्ही शिवसैनिक मनातून जाम खूश झालो.

आता दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवायला मोकळे झालो होतो. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी देखील तुटली होती. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाचा कस लागणार होता. कुलटा कमळाबाईची संगत नकोच ही शिवसैनिकांची मनोमन इच्छा यावेळी पूर्ण झाली होती. मोठ्या साहेबांच्या काळातही अनेक वेळा युतीत कुरबुरी झाल्या. ‘संशयकल्लोळ’ झाला. रागवारागवी झाली. पण, साहेबांनी कधी युती तुटू दिली नाही, असे ज्ञानामृत पाजणाऱ्या भक्ताडांना मी, टाळी एका हातानं वाजत नाही म्हणून चूप करतो.

पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी राज्यभर तुफान दौरे केले. शिवसैनिकांनी प्रत्येक मतदारसंघात प्राणाची बाजी लावली. शिवसेनेने झंझावती प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात २३ सभा घ्याव्या लागल्या, यातच ‘ठाकरे ब्रँड’चा आणि उद्धव साहेबांचा दरारा आणि रुबाब दिसून येतो. २८२ जागा लढवून आमचे ६३ वाघ निवडून आले. राज्यात आम्हाला सुमारे १९.५०% मतं मिळाली. हे जे काही होतं, ते एकट्या आमच्या शिवसेनेचं होतं. ‘आमच्यामुळे तुम्ही’ असं म्हणायला कोणालाच संधी नव्हती. साहेबांच्या पश्चात राज्याच्या पहिल्याच निवडणुकीत ६३ आमदार निवडून आणणं, ही उद्धवसाहेब वडिलांचा वारसा समर्थपणे सांभाळणार याची ग्वाही देणारी असामान्य बाब होती. महाराष्ट्रात ‘ठाकरे ब्रँड’च चालणार याची ग्वाही देणारी ही संख्या होती. शिवसैनिक मनोमन सुखावला होता.

भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे निश्चित होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला थोडी रुसवारुसवी झाली. आम्ही विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा कमळाबाई ‘मातोश्री’च्या भोवती घिरट्या घालू लागली आणि शेवटी २५ वर्षांच्या मैत्रीला जागून उद्धव साहेबांनी युती करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना-भाजपचे सरकार राज्यात स्थानापन्न झालं. उद्योग, परिवहन, पर्यावरण अशी खाती आमच्या पदरात पडली. पुन्हा एकदा युतीचा संसार सुरू झाला. आज आपल्याकडे बाळासाहेब नाहीत आणि भाजपकडे नरेंद्र मोदी आहेत, याचं भान उद्धव साहेबांनी ठेवलं, हा आमच्यासाठी शुभशकुन होता.

२०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनं पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाशी युती करून सरकार बनवलं. तो भाजपच्या दृष्टीनं मास्टर स्ट्रोक होता आणि आमच्या दृष्टीनं भाजपची लाचारी. शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम लीगशी केलेल्या तात्कालीक युतीबद्दल आजही अकलेचे तारे तोडणारे भाजपचे भक्त या अभद्र युतीबाबत मात्र चिडीचूप बसतात! त्यातच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. भारतात नोटबंदी आली. आम्ही सत्तेत सहभागी असताना देखील आमच्या साहेबांना नोटबंदीची कल्पना देण्यात आली नाही. नोटबंदीसारख्या मोठ्या निर्णयात आमच्या साहेबांना अंधारात ठेवणारा हा मोदी देशाला आपल्या बापाची मालमत्ता समजतो काय?

असाच संताप प्रत्येक शिवसैनिक व्यक्त करू लागला.

आणि मग आली २०१७ ची मुंबई महापालिका निवडणूक. ‘कमळा’बाईच्या आतला राक्षस जागा झाला. मुंबई महापालिका काहीही करून हडपायची म्हणून आम्ही स्वतंत्र लढणार, अशी घोषणा तिने करून टाकली. उद्धव साहेबांनी जीवाचं रान केलं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. आम्ही निकराने मुंबई महापालिका लढलो. आमचे ८४ नगरसेवक निवडून आले. केंद्राची सत्ता, राज्याची सत्ता हातात असताना पाण्यासारखा प्रचंड पैसा खर्च करून कमळाबाई ८२ वरच अडकली. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. दुसऱ्या बाजूला ‘बांडगुळ सेने’चा सगळा तोरा उतरला. नगरसेवकांची संख्या २८ वरून ७ वर आली. हीच त्यांची खरी औकात होती.

शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. उद्धव साहेबांनी चतुराईने गनिमी कावा करत बांडगुळांच्या ७ तले ६ नगरसेवक फोडले. आता आमचे नगरसेवक झाले ९०. काहीही करून आपला महापौर होत नाही, हे लक्षात आल्यावर कमळाबाईने नांगी टाकली. न मागता शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. पुन्हा एकदा मुंबईचा महापौर आमचाच झाला! मधून मधून युतीत कुरबुरी सुरू होत्या. पण युती टिकली पाहिजे, या मताचा मी होतो. उद्धवसाहेब सुद्धा मोठ्या हुशारीने संसार मोडणार नाही इतपतच कमळाबाईची अब्रू काढत. पण आम्ही शिवसैनिक कुठलं ऐकायला!

सप्टेंबर २०१७ मध्ये मोदी सरकारच्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईतल्या वेगवेगळ्या १२ ठिकाणी आंदोलन केलं. पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला सेनेने विरोध दर्शवला. ही पाळी दुर्दैवानं आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं आमचं म्हणणं होतं.

‘नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला. मात्र कहर म्हणजे सत्तेत भागीदार असूनही ‘एवढी माणसं कशाला, मोदीच्या मयताला’ अशा घोषणा द्यायला वाघाचं काळीज लागतं. हा उद्धव साहेबांनी पुढे चालवलेला ‘ठाकरी शैली’ चा वारसा होता. त्या आंदोलनानंतर आठवडाभर भाजपवाले गायब होते. बहुधा मोदींच्या मयताला गेले असावेत, असे म्हणून आम्ही शिवसैनिक खिदळत एकमेकांना टाळी देत होतो... तोपर्यंत २०१८ साल आलं. शिवसेनेचा व्याप आता वाढत होता. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत तीनही ठिकाणी आम्ही स्वकर्तृत्वावर सत्तेत सहभागी होतो. मातोश्री बंगला शिवसैनिकांसाठी अपुरा पडत होता. म्हणून उद्धव साहेबांनी फक्त शिवसैनिकांच्या प्रेमापोटी जुन्या ‘मातोश्री’ समोरच ८ मजली टोलेजंग ‘मातोश्री २’ या गडाचं बांधकाम करून घेतलं. शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचा उत्कर्ष सहन न झालेले जळकुटे भाजप भक्त तुमच्या साहेबांनी फोटोग्राफीवर बराच पैसा कमावला म्हणून फक्त हातपाय आपटत असतात. मी त्यांना ‘जलो मत, बराबरी करो’ सांगून त्यांच्या जखमेवर मीठ चोळतो.

याच २०१८ साली उद्धव साहेब अयोध्येला गेले होते. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’चे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज शहरभर लागली होती. उत्तर प्रदेशच्या शिवसैनिकांनी उद्धव साहेबांचं दणक्यात स्वागत केलं. भाजपने गोरखपूरच्या योगी आदित्यनाथ नावाच्या कोणत्या तरी संन्याशाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केलं होतं. या आमच्या मुंबईच्या भाजपवाल्यांना त्या योगीचं कोण कौतुक! आम्ही तर त्या योगीचा त्याच्या मूळ नावानं, अजयसिंग बिश्त या नावानंच उल्लेख करायचो आणि त्याचं कौतुक करणाऱ्या इथल्या भिकारड्या भाजपवाल्यांची ‘मराठी भय्ये’ म्हणून जाम टर उडवायचो. त्या अजयसिंग बिश्तला बाळासाहेबांच्या बछड्यानं, उद्धव साहेबांनी त्याच्याच उत्तर प्रदेशात जाऊन, ‘पहले मंदिर फिर सरकार’चा सज्जड दम भरला होता.

२०२० साली एका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्धव साहेब हसत हसत विनोदी शैलीत ‘निर्मलाजी, मला बजेटमधलं काही कळत नाही’ म्हणाले होते.

बिनडोक भक्तांनी त्याचा कोण गहजब केला. त्यांच्या अकलेच्या पलीकडची ती कोटी होती. एका भक्ताने तर, ‘तुझ्या साहेबाला बजेट मधलं काही कळत नसेल पण मुंबई महापालिकेच्या टेंडरमधली टक्केवारी बरोबर काढता येते असे म्हणत बरीच कावकाव केली. मी त्याला घरावर बसलेल्या कावळ्याला उडवतात तसा उडवून लावला.’

आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. प्रादेशिक पक्षांना गिळायला बसलेल्या कमळाबाईने आमचा घातच केला असता. पण, नियतीपुढे तिचे काही चालले नाही. त्यातच २०१८ मध्ये राज्याच्या ‘विशेष दर्जा’वरून चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमने भाजपची साथ सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून त्यांनी मोदी सरकारवर अविश्वासाचा ठराव देखील आणला पण शिवसेना मात्र भाजपच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. २०१८ सालीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशी महत्त्वाची राज्यं हातून निसटल्यावर २०१९ ची लोकसभा देखील हातातून निसटते की काय, या भीतीने गारठलेले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा नाक मुठीत धरून मातोश्रीवर आले. ‘वाकल्या झुकल्या गर्विष्ठ माना, या मातोश्री मंदिरी’ अशीच ती भेट झाली होती. उद्धव साहेबांशी गोडगोड गप्पा मारल्या. युतीच्या आणाभाका घेतल्या. विधानसभेलादेखील युतीतच लढू... सत्तेत अर्धी-अर्धी भागीदारी अर्थात् शिवसेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला काहीच अडचण नाही. असा बंद दाराआड शब्द देऊन गेला. हे स्वतः उद्धवसाहेब सांगताहेत म्हटल्यानंतर आम्हा शिवसैनिकांच्या मनात कोणतीही शंका उरली नाही.

२०१९ ची लोकसभा आम्ही युतीतच लढणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. कारण ‘कमळा’बाई आमच्या गळ्यातच पडली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही २३ जागांवर लढलो आणि परत एकदा आमचे १८ वाघ ठाकरे ब्रँडच्या जोरावर संसदेत डरकाळी फोडायला सज्ज झाले. कमळाबाईने २५ मतदार संघांत पदर पसरला आणि २३ ठिकाणी पदरात दान पडले. त्यांच्या या विजयात शिवसैनिकांच्या कष्टांचा आणि मतांचा भरीव सहभाग होता. पण मान्य करेल तर ती ‘कमळा’बाई कसली? २०१९ मे महिन्यात आमचे अरविंद सावंत नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. बाकीच्या मंत्रिपदांसाठी उद्धव साहेबांचं पंतप्रधानांशी घमासान सुरू होतं. पण, मनाजोगता तोडगा निघत नव्हता. आता जेमतेम ६ महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागणार होत्या. उद्धव साहेबांना २.५ वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचं लोकसभा निवडणुकीआधीच अमित शहा यांनी कबूल केलेलं असल्यामुळे युती होणार हे नक्की होतं.

ही निवडणूक आमच्यासाठी अभूतपूर्व होती. ठाकरे घराण्याचा वारस, मोठ्या साहेबांचे नातू, आदित्यसाहेब स्वतः वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे, आमच्यासाठी ही निवडणूक विशेष उत्साहाची होती. प्रतिष्ठेची होती. ऐतिहासिक होती. शिवसेनेचे तिथले आमदार सुनील शिंदे यांनी अगदी स्वखुशीने आदित्यसाहेबांसाठी आपली जागा मोकळी केली. शिवाय उगाच दगाफटका नको म्हणून वरळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिनभाऊ अहिर यांना उद्धव साहेबांनी शिवसेनेत घेतलं. आदित्यसाहेबांचा धुमधडाक्यात प्रचार सुरू झाला. आदित्यसाहेबांच्या फोटोसह ‘नमस्ते वरळी’चे पोस्टर्स गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कन्नड भाषांमध्ये लावण्यात आले. पण उर्दूमधील ‘सलाम वरळी’चं होर्डिंग मात्र माझ्या डोळ्याला भयंकर खटकलं. उगाच दगाफटका नको, म्हणून शिवसेनेने काळजी घेतली असेल, असं मानून मी मनाचं समाधान करून घेतलं. पुढे प्रचाराच्या धुमधडाक्यात मी हे उर्दू होर्डिंग विसरूनही गेलो! या निवडणुकीचा अर्ज दाखल करताना आदित्य साहेबांनी जाहीर केलेली आपली संपत्ती बघून मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे युती झाली. यावेळी उद्धवसाहेबांनी युतीला जागून विलक्षण त्याग करत १२४ जागांवर समाधान मानलं. उद्धवसाहेबांनी प्रचाराची शर्थ केली. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आणि १२४ पैकी आमचे ५६ वाघ निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस ५४ आणि काँग्रेस ४४ वर पोचली होती. प्रचारात ‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...’चा धोशा लावणारी ‘कमळा’बाई १२२ वरून १०५ वर आली होती. पण तिची अक्कड गेली नव्हती. शिवसेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्री पद द्यायला कमळी तयार नव्हती. उद्धवसाहेबांनी देवेंद्र फडणवीसचे तब्बल १८ फोन उचललेच नाहीत आणि कमळाबाईची चांगलीच जिरवली.

Comments
Add Comment