मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील सुरक्षा यंत्रणा आता अधिक कडक करण्यात आली आहे. मेल आणि एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बॅगेज स्कॅनिंग (सामानाची तपासणी) बंधनकारक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने उचललेले हे पाऊल विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची आठवण करून देणारे आहे. रेल्वे प्रशासनाने लागू केलेल्या नवीन नियमानुसार, स्थानकात प्रवेश करताना सुरक्षा अधिकारी बॅगेज स्कॅनरद्वारे प्रत्येक बॅगेची बारकाईने तपासणी करतील. ज्या बॅगांची तपासणी पूर्ण होईल, त्यावर विशेष 'स्टिकर' लावले जाणार आहे. ज्या प्रवाशांच्या सामानावर हे स्टिकर नसेल, त्यांना टर्मिनसमध्ये प्रवेश नाकारला जाईल. यामुळे प्रवाशांना आता प्रवासाच्या वेळेपूर्वी थोडे लवकर स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. देशातील एक महत्त्वाचे टर्मिनस असूनही सीएसएमटीवर प्रवाशांच्या सामानाची नियमित तपासणी होत नसल्याची बाब अनेकदा समोर आली होती. सुरक्षेच्या या गंभीर त्रुटींकडे प्रसारमाध्यमांनी वारंवार लक्ष वेधले होते. अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत मुख्य प्रवेशद्वारावर दोन अत्याधुनिक बॅगेज स्कॅनर बसवले असून सुरक्षेचा ताफाही तैनात केला आहे. सीएसएमटीवरून दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात आणि लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. यापूर्वी सुरक्षा उपाय अपुरे असल्याने प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण असायचे. मात्र, आता सुरू झालेल्या या सक्तीच्या तपासणीमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये २०२६ सालाची सुरुवात अत्यंत दिमाखदार झाली असून, सध्या एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे, तो म्हणजे शाहिद कपूरचा 'ओ रोमीओ'. ...
तिकीट खिडकी ते प्लॅटफॉर्मपर्यंत कडेकोट बंदोबस्त...
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी आता 'नो स्कॅनिंग, नो एन्ट्री' हे धोरण राबवले जात आहे. स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने लोकल प्लॅटफॉर्म आणि तिकीट काउंटरकडून एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावले आहेत. प्रवाशांची बॅग स्कॅनरमधून गेल्याशिवाय त्यांना प्लॅटफॉर्मवर पाऊलही ठेवता येणार नाही. प्रवाशांच्या सामानात कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही ज्वालाग्राही, घातक किंवा संशयास्पद वस्तू तर नाही ना, याची खात्री सुरक्षा दलाचे जवान करणार आहेत. केवळ प्रवाशांच्या बॅगाच नाही, तर स्थानकावरील क्लॉक रूममध्ये (सामानाचे घर) ठेवण्यात येणाऱ्या सामानाचीही कडक तपासणी केली जात आहे. यामुळे स्थानक परिसरात कोणतीही बेवारस किंवा धोकादायक वस्तू राहण्याची शक्यता संपुष्टात येईल. 'स्टिकर पद्धती'मुळे तपासणी झालेलं सामान लांबूनच ओळखता येणार असल्याने सुरक्षा यंत्रणेचा ताणही कमी होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, ही सुरक्षा यंत्णा केवळ सुरुवात आहे. सीएसएमटीवरील या प्रयोगाच्या यशानंतर मुंबईतील इतर महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसवरही अशाच प्रकारे उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था लागू केली जाईल. यामुळे मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.






