मुंबई : "महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनात ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होऊ नयेत, यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला विकृत चेहरा समोर आणला आहे," अशी घणाघाती टीका भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेचा समाचार घेताना बावनकुळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपला संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, महायुती सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली, तेव्हापासूनच काँग्रेसने यात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
सुरुवातीला काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांमार्फत हायकोर्टात याचिका दाखल करून योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला आणि आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन बहिणींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बहिणींच्या आनंदावर विरजण घालण्याचे काम'
बावनकुळे पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये जमा करत आहे. या पैशांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळत आहे, संसाराला हातभार लागत आहे. मात्र, बहिणींच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काँग्रेसला सहन होत नाहीये. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा आता जनतेसमोर आली आहे."
' महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही'
काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचा उल्लेख करत बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकार बहिणींच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मात्र, काँग्रेसचा हा मत्सर आणि आकस महाराष्ट्रातील माता-भगिनी कधीही विसरणार नाहीत. या विकृत कृतीसाठी राज्याची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.






