बीड : बीड शहराचा गुन्हेगारीचा डाग पुसला जात नसून त्यात दिवसेंदिवस अधिक भर होत चालली आहे. भरदिवसा शहरात एका पाईपलाईनसाठी खड्डा खणणाऱ्या मजुराची ६ जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात होते. भर दिवसा अशा प्रकारे एका मजुराची हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या हत्येचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये गोळीबार करणारा पळून जाताना दिसत आहे.
मंगळवार ६ जानेवारी रोजी बीड येथील अंकुशनगर भागात एका पाईपलाईनचे काम करणाऱ्या मजुरावर अत्यंत जवळून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. नगर परिषदेत रोजंदारीवर मजुरी करणारे हर्षद शिंदे यांची हत्या झाल्याचे नंतर उघडकीस आले. दिवसाढवळ्या एका मजूरावर गोळीबार झाल्याने बीड शहरात घबराट पसरली होती.
हर्षद शिंदे यांचा गोळीबारात मृत्यू
पाईपलाईनसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरु होते. त्या दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरानी हर्षद शिंदेवर गोळीबार केला. त्यामुळे हर्षद शिंदे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी विशाल सुर्यवंशी हा घटना स्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळ्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर पंचनामा करण्यात आला. पोलिसांना हर्षद शिंदे याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी दवाखान्यात पाठवून दिला. या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती सापडले आहेत. दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीडमधील कायदा-सुव्यवस्था पुन्हा चर्चेत आली आहे.






