मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) मेल आणि एक्सप्रेस प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाय वाढवण्यासाठी विमानतळासारखी सुविधा लागू केली आहे. बॅगेज स्कॅनरद्वारे प्रवाशांचे सामान तपासले जाणार आहे. तपासणी न झालेल्या प्रवाशांना टर्मिनसमध्ये प्रवेश मिळणार नाही. सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी तपासणी पूर्ण झालेल्या बॅगेजवर स्टिकर लावण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य रेल्वेचे मुंबईतील प्रमुख टर्मिनस असून येथून दररोज शेकडो मेल आणि एक्सप्रेस गाड्या सुटतात. यापूर्वी केलेले सुरक्षा उपाय अपुरे असल्यामुळे प्रवाशांचे सामान नियमित तपासले जात नव्हते, ज्यावर प्रसार माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. आता रेल्वे प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारावर दोन बॅगेज स्कॅनर बसवले आहेत. लोकलच्या प्लॅटफॉर्मवरून आणि तिकीट काउंटरकडून एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेड्स लावले गेले आहेत. या उपायांमुळे बॅग तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल, ज्यामुळे टर्मिनसवर प्रवाशांची सुरक्षितता वाढेल.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, प्रवाशांना वैध तिकीट देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांच्या बॅगेजची तपासणी करणेही अत्यंत गरजेचे आहे. प्रवाशांच्या बॅगमधून कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही संशयास्पद वस्तू नेली जात नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी क्लॉक रूममध्ये ठेवलेल्या सामानाचीही तपासणी केली जात आहे.
सुरक्षेबाबत मोठा निर्णय..
बॅगेज स्कॅनिंगसह स्टिकर पद्धतीमुळे प्रवाशांना तपासणी पूर्ण झाल्याचे तत्काळ कळते. या उपाययोजनांमुळे CSMT टर्मिनसवर प्रवाशांचा विश्वास वाढेल, प्रवास अधिक सुरक्षित होईल. भविष्यात हे नियम अन्य महत्त्वाच्या टर्मिनसवर देखील लागू केले जातील, अशी माहिती रेल्वे प्रशानने दिली आहे.






