सिंधुदुर्ग : "महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तेचा गैरवापर करून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला होता," असा खुलासा भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला.
नितेश राणे म्हणाले की, "कोरोना काळात जेव्हा महाराष्ट्र अधोगतीकडे जात होता, तेव्हा उद्धव ठाकरे विरोधकांना जेलमध्ये कसे टाकता येईल, याचे नियोजन करण्यात व्यस्त होते. ठाण्यातील खोट्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. आता जे सत्तेच्या गैरवापराबद्दल ओरडत आहेत, त्यांनी मागे वळून स्वतःचे पाप पाहावे."
आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, "आदित्य ठाकरे म्हणजे केवळ ६ हजार मतांनी निवडून आलेले 'काठावर' पास झालेले विद्यार्थी आहेत. त्यांनी मुंबईसाठी फोटोसेशन आणि नाईट लाईफ व्यतिरिक्त काहीही केलेले नाही. बीडीडी चाळीचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला, आदित्य ठाकरेंनी त्याचे केवळ श्रेय घेण्याचे काम केले."
ओवैसींना कडक इशारा
असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानांचा समाचार घेताना नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले की, "या देशाचा पंतप्रधान केवळ तोच होऊ शकतो जो तिरंग्याला मानतो आणि ‘वंदे मातरम्’ म्हणतो. ओवैसींनी सांगावे की त्यांच्यासाठी संविधान महत्त्वाचे आहे की कुराण? त्यांनी जास्त तोंड उघडू नये, अन्यथा बाबासाहेबांचे इस्लामबाबतचे विचार आम्हाला जनतेसमोर मांडावे लागतील. या देशाच्या सर्वोच्च पदावर केवळ हिंदूच बसेल, कोणताही जिहादी नाही."
कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध
राजकीय टीकेसोबतच नितेश राणे यांनी विकासाचे मुद्देही मांडले. सिंधुदुर्गातील शाळा बंद होऊ नयेत यासाठी त्यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून कोकणसाठी विदर्भ-मराठवाड्याचे निकष लावू नयेत, असा आग्रह धरला आहे. तसेच राजकोट येथील शिवसृष्टीसाठी ९० कोटींची तरतूद करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.






