Friday, January 9, 2026

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर

ब्राझिल आणि चीनलाही इशारा

पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा आरोप

रशियाच्या ऊर्जा प्रकल्पात अमेरिकेच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणारे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर, विशेषतः भारत, चीन आणि ब्राझीलवर ५०० टक्क्यांपर्यंत कर लादण्याच्या तरतुदींचा समावेश आहे. हे आयातशुल्क अमेरिकेने ५०० टक्क्यांपर्यंत नेल्यास भारतातून अमेरिकेत जाणारी निर्यात पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली, त्यादरम्यान ट्रम्प यांनी हे विधेयक काँग्रेसमध्ये मांडण्यास हिरवा कंदील दाखवला. हे विधेयक अनेक महिन्यांपासून विकसित होत आहे व पुढील आठवड्यात काँग्रेसमध्ये त्यावर मतदान होण्याची अपेक्षा आहे. ‘सँक्शनिंग ऑफ रशिया अॅक्ट २०२५’ नावाचे हे विधेयक युक्रेन युद्धादरम्यान रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणण्यासाठी आहे. अमेरिकेचा आरोप आहे की यामुळे रशियाला युद्धात मदत होत आहे.

या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची शक्यता लिंडसे यांनी व्यक्त केली आहे.

पुढील आठवड्यात विधेयक मंजूर होण्याची शक्यता

सिनेटर ग्राहम लिंडसे म्हणाले, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर विविध विषयांवर सकारात्मक बैठक पार पडली. ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लावण्याच्या विधेयकाला हिरवा कंदील दाखवला आहे. मी आणि सिनेटर ब्लूमेंथल व इतर या विधेयकावर काही महिन्यांपासून काम करत होतो. हे विधेयक मंजूर होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. युक्रेन शांततेसाठी प्रयत्न करत आहे, तर पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत आहे. स्वस्त तेल खरेदी करून पुतिन यांना युद्धात मदत करणाऱ्या भारत, चीन, ब्राझील या देशांना धडा शिकवण्यासाठी ट्रम्प यांना हे विधेयक मदत करेल. पुढील आठवड्यात हे विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकेकडून लवकरच मंजूर होणाऱ्या या विधेयकामुळे भारतामध्ये वस्तू महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विधेयक संमत झाले तर...

सध्याच्या घडीला सिनेट आणि हाऊस ऑफ लीडर्सने या विधेयकावरचे मतदान पुढे ढकलले आहे. जर हे विधेयक सिनेटमध्ये संमत झालं तर रशियाला एक्सपोर्ट होणाऱ्या यूएसच्या वस्तूंवरही बंदी येणार आहे. त्याचबरोबर रशियाच्या ऊर्जा प्रकल्पात अमेरिकेला गुंतवणूक करता येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर रशियाकडून भारत कच्चं तेल स्वस्तात खरेदी करतो म्हणून भारतावर अजून २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यामुळे भारतावर सध्या ५० टक्के टॅरिफ आहे. अमेरिकेने चीनवर १४५ टक्के टॅरिफ लावला आहे. त्यानंतर चीनने अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ लावत जशास तसे उत्तर दिले आहे. मात्र जर नवे विधेयक पास झाले तर चीनवर लादलेले टॅरिफ ५०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा