डॉ. अभयकुमार दांडगे
महानगरपालिका निवडणुकीत प्रचार पद्धतीत बदल दिसतोय. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब याद्वारे प्रचार होतोय. मनपाच्या या निवडणुकीत डिजिटल माध्यमांचा वापर होत आहे. मोबाईलच्या स्क्रीनद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तसेच गल्लीबोळातही प्रचाराची ओळख ठेवत उमेदवार व नेते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मराठवाड्यातील महापालिका क्षेत्र पिंजून काढले. भाजपसह इतरही पक्षांच्या मातब्बर नेत्यांनी मराठवाड्यात प्रचाराचे आखाडे चांगलेच गाजविले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर व नांदेड या पाच महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत आपापल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपसह शिंदेसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट, उबाठा, एमआयएम, रिपाइं या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांनी कंबर कसून मेहनत घेतली. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांचे असमाधान झाले. त्यानंतर मात्र मराठवाड्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच फाटाफूट झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्याच्या प्रचार सभांमध्ये नांदेड व जालना या दोन शहरांत औद्योगिक विस्तार करण्याचे आश्वासन दिले. ही दोन्ही शहरे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तर लातूर येथील प्रचार सभेतून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कार्य राज्यात चांगले होते,अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. काँग्रेसच्या हाती सत्ता देऊन आजवर लातूरचा विकास न झाल्यामुळे यावेळेस भाजपच्या हातात सत्ता द्या, लातूरच्या विकासाची जबाबदारी माझी, असे आश्वासन फडणवीस यांनी लातूर येथील जाहीर सभेत दिले.
लातूर मनपा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे उद्गार काढले. यामुळे लातूर मनपा निवडणुकीत भाजप विरोधी वातावरण तयार झाले होते; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या प्रचार सभेत याबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकला. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या लातूरमध्ये या वक्तव्याचा फटका भाजपला बसू शकतो, असे काहीसे चित्र निर्माण झाले होते; परंतु हळूहळू ते वातावरण बऱ्याच प्रमाणात निवळले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातुरातून पुसणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. हा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, अशा शब्दांत सपकाळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावर टीका केली. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर शिवसेनेकडून संपर्कप्रमुख सिद्धराम म्हेत्रे तसेच काँग्रेस व वंचित आघाडीकडून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याही वादळी सभा पार पडल्या. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर तसेच नांदेड शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पानंतर कोणीही पाण्याची पुरेशी व्यवस्था करू शकले नाहीत. खुद्द त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाण हे देखील मुख्यमंत्री असतानाही नांदेडच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. याबद्दलही नांदेडच्या मतदारांमध्ये अशोक चव्हाण यांच्याविषयी नेहमीच खदखद असते.
मराठवाड्यातील पाण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर एकाही नेत्याने आपले मत मांडलेले नाही. त्यामुळे जनतेला जे हवे आहे ते एकाही प्रचार सभेमधून ऐकावयास मिळाले नसल्याची तक्रार मतदार करीत आहेत. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मराठवाड्यात लक्ष केंद्रित केले आहे. भाजपला तसेच काँग्रेसला मतदान न करता एमआयएम पक्षाच्याच उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन ते जाहीर सभेतून करत आहेत. छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेड शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर मुस्लीम समाजातील काही नागरिकांनी हल्ला केला. तिकीट वाटप करत असताना एमआयएम पक्षाने पैसे घेऊन उमेदवारी बहाल केली, असा आरोप त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील इच्छुक उमेदवारांचा तसेच त्यांच्या समर्थकांचा जनक्षोभ दिसून आला. मनपा निवडणुकीसाठी काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. हे लक्षात घेऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यातील पाच महानगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात या दृष्टीने पक्षाचे नेते व पदाधिकारी तसेच इच्छुक नगरसेवक साम-दाम-दंड-भेद या नीतीने कामाला लागले आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ रोजी मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर मराठवाड्यातील पाच महानगरपालिका कोणाच्या व कोणत्या पक्षाचा महापौर हे स्पष्ट होणार आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रचार पद्धतीत एक वेगळा बदल दिसून आला. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम रील्स, यूट्यूब याद्वारे सोशल मीडियाचा आधार घेत उमेदवारांनी प्रचार केला. अनेक उमेदवारांनी यावेळी देखील रस्त्यावरच्या प्रचारात पारंपरिक प्रचार साधनांचा वापर केला. रिक्षावर भोंगा लावून प्रचार करणे तसेच स्क्रीनवर स्वतःच्या व नेत्यांच्या कामाचा लेखाजोखा दाखविणे, अशा पद्धतीने प्रचाराचा हा टप्पा केंद्रित केला. मनपाच्या या निवडणुकीत डिजिटल माध्यमांचा वापरही होत आहे. परंतु जे काही उमेदवार निवडून येतील ते जनतेच्या कितपत सेवेसाठी तत्पर असतील हे येणारा काळच सांगेल.