Friday, January 9, 2026

बोटावरची शाई दाखवा अन् सवलतींचा लाभ घ्या

बोटावरची शाई दाखवा अन् सवलतींचा लाभ घ्या

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेची मोहीम

विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महापालिकेने मतदारांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच मतदार करणाऱ्या मतदारांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार आहेत. मतदान केल्यानंतर मतदारांना हॉटेल्स बिलांमध्ये व रिक्षा, बस भाड्यांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

वसई-विरार महापालिकेची ११५ जागासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ११ लाख २६ हजार ४०० इतके मतदार आहेत. या मतदारांनी मतदानाच्या दिवशी घरा बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पालिकेची जनजागृती मोहीम सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकताच महापालिकेत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स असोसिएशन, रिक्षा युनियन, परिवहन सेवा पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव आहे, मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा या उद्देशाने मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल्सच्या बिलांमध्ये, रिक्षा व बस प्रवासभाड्यामध्ये सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी हॉटेलच्या बिलामधून १५ टक्के सवलत, रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत, परिवहन विभागाच्या बस मध्येही विशेष सवलत दिली जाणार आहे.मतदानाच्या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडून उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी रिक्षा, हॉटेल चालक, केशकर्तनालय यांच्या सहकार्याने विशेष सवलती देण्यात आल्या आहेत असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment