चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २७ वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहरातील महाकाली वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर परिसरात राहणाऱ्या दीक्षा शुभम भडके या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पतीवर पत्नीला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, मृत्यूपूर्व जबाबातही पतीचेच नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शुभम भडके हा घरी आला. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली त्यानंतर त्याने पत्नी दीक्षाला पेटवून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता दीक्षा गंभीर अवस्थेत, पूर्णतः भाजलेली आढळून आली. तिला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण काय, पतीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस तपासातून घेतला जात आहे.






