Friday, January 30, 2026

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असतानाच, मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईत पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgoankar) यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे (Santosh Nalawade) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. नलावडे यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या संतोष नलावडे यांनी एका पत्राद्वारे आपली कैफियत मांडली आहे. या पत्रात त्यांनी मनसे सोडण्यामागची वेदना व्यक्त करताना पक्षाच्या बदलत्या राजकीय धोरणांवर थेट बोट ठेवले आहे. "ज्या ध्येयधोरणांसाठी आम्ही झटलो, ती आता बदलली आहेत," असे संकेत देत त्यांनी आपली नाराजी उघड केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवडी परिसरात मनसेला मोठे खिंडार पडले असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एककीडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगत असताना, दुसरीकडे पक्षातील महत्त्वाचे मोहरे सत्ताधारी गटात सामील होत असल्याने मनसे समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

"पक्षाच्या वटवृक्षाला नेतेच देतात विषारी इंजेक्शन!"

संतोष नलावडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "राजसाहेबांनी विचारांनी जो पक्ष फुलवला आणि कार्यकर्त्यांनी रक्त सांडून ज्याचा वटवृक्ष केला, त्या वटवृक्षाला आता पक्षातील काही स्वार्थी नेतेच विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम करत आहेत," अशा शब्दात नलावडे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. संतोष नलावडे यांनी आपल्या पत्रात पक्षातील अंतर्गत कुरघोडींवर थेट बोट ठेवले आहे. राज ठाकरेंच्या विचारांवर निष्ठा ठेवून अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. "पक्षात आता 'वापरा आणि फेकून द्या' (Use and Throw) हे धोरण राबवले जात आहे. वरिष्ठ नेते स्वतःच्या फायद्यासाठी पक्षाचा पाया कमकुवत करत आहेत. ज्या वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावा घ्यायचो, त्या वटवृक्षाच्या फांद्या आता स्वार्थासाठी छाटल्या जात आहेत," अशी जहरी टीका त्यांनी केली.

'जिथे पक्षीही बसणार नाहीत, तिथे आम्ही का राहावे?'

पक्षाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना नलावडे म्हणाले की, "विषारी इंजेक्शन दिलेल्या झाडाला ना कधी पाने येतात, ना फुले, ना फळे. अशा झाडावर पक्षीदेखील बसत नाहीत. जर आमचा आधारच पद्धतशीरपणे नष्ट केला जात असेल, तर आम्ही उभे राहायचे तरी कुठे?" या एका प्रश्नाने मनसेच्या अंतर्गत शिस्तीवर आणि नेत्यांच्या वागणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर एका जुन्या आणि निष्ठावान शिलेदाराने अशा प्रकारे तोफ डागल्याने मनसेच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मराठी बालेकिल्ल्यांमध्ये आमचा राजकीय बळी दिला जातोय!"

"शिवडी, माहीम, वरळी आणि भांडुप यांसारख्या मराठी माणसांच्या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेचा हक्काचा मतदार असतानाही, आमचा राजकीय बळी दिला जात आहे आणि हे केवळ अयोग्यच नाही, तर 'पाप' आहे," अशा शब्दांत नलावडे यांनी आपल्या पत्रातून संताप व्यक्त केला आहे. संतोष नलावडे यांच्या मते, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला जे अपयश आले, त्यासाठी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. "विधानसभेच्या पराभवाचे खापर सर्वस्वी आमच्या माथी मारून आता आगामी निवडणुकीत आम्हाला डावलले जात आहे. ज्या भागात मनसेची निर्णायक ताकद आहे, तिथेच पक्षाने शरणागती पत्करणे हा कार्यकर्त्यांशी विश्वासघात आहे," असा दावा नलावडे यांनी केला आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील ज्या मतदारसंघांमध्ये मनसेचे अस्तित्व टिकून आहे, तिथेच पक्षाने चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप नलावडे यांनी केला. शिवडीसारख्या भागात जिथे मनसेचा 'कडवट' सैनिक अहोरात्र राबतो, तिथे राजकीय बळी दिला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. "मराठी बालेकिल्ल्यांमध्ये मनसे बॅकफूटवर जाणे हे कार्यकर्त्यांच्या संयमाचा अंत पाहणारे आहे," असेही त्यांनी पत्रात नमूद केले. या स्फोटक आरोपामुळे मनसेच्या बालेकिल्ल्यांमध्ये मोठी राजकीय पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२० वर्षे तुरुंगवास सोसला, पण निवडणुकीच्या वेळी वाऱ्यावर...

"गेल्या २० वर्षांपासून ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आंदोलने केली, अंगावर केसेस घेतल्या आणि तुरुंगवास भोगला, त्यांना आज निवडणुकीच्या ऐन धामधुमीत सन्मानाची वागणूक न देता वाऱ्यावर सोडले गेले आहे," असा संताप नलावडे यांनी व्यक्त केला. नलावडे यांनी विशेषतः शिवडीतील प्रभाग क्रमांक २०२, २०३, २०४ आणि २०६ मधील परिस्थितीवर बोट ठेवले आहे. या प्रभागांमधील सक्षम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विचार पक्षाने केला नसल्याचा दावा त्यांनी केला. "माझी नाराजी ही स्वतःला उमेदवारी मिळाली नाही म्हणून मुळीच नाही, तर माझ्यासोबत राबणाऱ्या इतर सक्षम सहकाऱ्यांचाही विचार झाला नाही, याचे मला दुःख आहे," असे नलावडे यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ नेत्यांना जाब विचारताना नलावडे यांनी विचारले आहे की, "जर माझ्याशी वैयक्तिक मतभेद असतील किंवा माझ्यावर राग असेल, तर त्याचा फटका इतर प्रामाणिक महाराष्ट्र सैनिकांना का बसला? त्यांना का डावलले गेले?" पक्षात निष्ठेपेक्षा अंतर्गत राजकारण मोठे झाले असल्याचा आरोप करत, ज्यांनी रक्त सांडून पक्ष वाढवला त्यांना सन्मान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तर चक्रव्यूह भेदणारा योद्धा व्हायचंय!"

"ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला, त्यांना आज वरिष्ठ नेत्यांचे जोडे उचलण्यास भाग पाडले जात आहे," असा खळबळजनक आरोप करत नलावडे यांनी मनसेच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली आहे. पक्षातील काही नेत्यांच्या धोरणांवर टीका करताना नलावडे म्हणाले की, "आज पक्षात नेत्यांची धोरणे कचखाऊ आणि कुटील झाली आहेत. कार्यकर्त्यांना केवळ 'वापरा आणि फेकून द्या' (Use and Throw) अशी वागणूक मिळत आहे. जिथे घामाची आणि रक्ताची किंमत उरली नाही, तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही." पक्षात राहून स्वतःची घुसमट करून घेण्यापेक्षा स्वाभिमानाने बाहेर पडणे त्यांनी पसंत केले आहे. आपल्या निर्णयाचे समर्थन करताना नलावडे यांनी ऐतिहासिक संदर्भाचा वापर केला. ते म्हणाले, "कुठे थांबायचे, हे ज्याला कळते तोच भविष्यात पुढे जातो. मला या राजकीय षडयंत्राच्या चक्रव्यूहात अडकलेला 'अभिमन्यू' होऊन आपला बळी द्यायचा नाही, तर हा चक्रव्यूह मोडून काढणारा 'योद्धा' व्हायचे आहे." त्यांच्या या विधानाने ते आता नवीन राजकीय प्रवासात (एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत) अधिक आक्रमक भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment