डॉ. देवीदास पोटे
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा ।
चित्त शुद्धी सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठली गाई जे एकांती ।
अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीका अंतरी न द्यावी वसति ।
करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा ।
बा उगी हे वाचा वेचू नये ॥३॥
संत तुकाराम महाराजांची अभंगवाणीतून एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे विचारांना दिशा मिळते. परमेश्वराला अंतरंगात ठाव देऊन आपले अवघे आयुष्य कृतार्थ करण्याचा मंत्र तुकोबारायांनी दिला. त्यांनी काम, क्रोध आदी षडरियूंचा विठ्ठलचरणी समर्पण केले. पापपुण्याच्या पायऱ्या ओलांडून ते स्वर्गाचं सुख अनुभवू लागते. पाप-पुण्य या दोन्ही बाबींची आता गरज राहिली नाही. परमेश्वराच्या समीप गेल्याची ही अवस्था आहे.
मात्र या परम अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तुकाराम महाराजांना मोठा आंतरिक संघर्ष करावा लागला. मानवी मनाला मोह पाडणाऱ्या अनेक प्रकारच्या रिपुंशी झगडावेे लागलेः षडरिपुंचा अडथळा दूर करावा लागला. या अनुभवातून गेल्यामुळेच आपल्या अनुभूतीचे सार ते सांगतात. ते म्हणतात, 'आपले खरे हित साधायचे असेल तर दंभ वा खोटोपणा दूर ठेवा. स्वच्छ, शुद्ध मनाने परमेश्वराची आळवणी करा. मन शुद्ध करणे ही देवाची सेवाच आहे. विठ्ठल हा सर्व विश्वाचा विधाता आहे. विठ्ठलाचे नाम अमृतासारखे आहे. विठ्ठलनामाची आळवणी नीरव एकांतात आपल्या हृदयात करा. मग पाहा, अलभ्य वाटणारे लाभही तुम्हाला कसे प्राप्त होतात ते'. विठ्ठलनामाच्या चिंतनाव्यतिरिक्त मनात इतर कुठल्याही गोष्टींना थारा देऊ नका. वासना ही माणसाला अनेक वाईट गोष्टींकडे वळवते. त्या वासनेला भक्तिमार्गाकडे वळवा आणि भक्तिरंगाच्या अपूर्व आनंदाने वासनेची शांती करा. मम षडरियुंचा काळोख वितळून जातो आणि उजेडाचे पर्व सुरू होते. 'नित्य नवा दिस जागृतीचा' अशी आपली अवस्था होते. हाच निर्वाणीचा आणि अखेरचा रामबाण उपाय आहे. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही बाबतीत आपली वाणी व्यर्थ खर्च करू नये.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतील त्यांचा अमृतमय उपदेश हाच आपल्या हिताचा राजमार्ग आहे, हेच आपले सुखाचे माहेर आहे.