Friday, January 9, 2026

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

खारघर-कामोठ्यात  कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून आल्याने गुरुवारी पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे.

मोरबे धरणातून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या २०५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत ही गळती आढळल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या बिघाडाचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह सिडकोच्या खारघर व कामोठे परिसरावर होणार असून, आज सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ जलवाहिनीत तांत्रिक बिघाड लक्षात येताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीसाठी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.

उद्या सकाळपासून पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरळीत करण्यात येईल, असा अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. अनपेक्षित तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त शहर अभियंत्यांनी केले आहे.

Comments
Add Comment