Friday, January 9, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला टाळे ठोका

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला टाळे ठोका

स्थानिकांचा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर घुमला आवाज

चिपळूण :  टाळे ठोका, टाळे ठोका, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला टाळे ठोका, निसर्ग संपन्न कोकण वाचवा, लोकहो जागे व्हा, आपल्या पुढील पिढ्यांचे रक्षण करा, कोण म्हणतोय जाणार नाही, आम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही, अशा गगनभेदी घोषणा स्थानिकांनी देत परिसर दणाणून सोडला. तर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी कार्यालयात बोलावून चर्चा केली. मात्र, यावेळी उपस्थितांचे समाधान झाले नाही. अखेर जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण होत नाही तसेच आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची चौकशी समिती नेमून अहवाल येत नाही तोपर्यंत ही कंपनी बंद ठेवावी; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आणि यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिकच्या ‘पीफास’ या उत्पादनसंदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासह स्थानिकानी आंदोलनाची हाक दिली होती. गुरुवारी लोटे येथील एक्सल फाटा येथे आंदोलक हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाले आणि कंपनी विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.माजी खा. हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पोलिसांनी सुरुवातीला प्रवेशद्वारावर आंदोलनकर्त्यांना अडविले. आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळाला कंपनी कार्यालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी कंपनी व्यवस्थापन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. खेड, लोटे परिसरातील अशा अनेक कंपन्या आहेत. त्यांनी सांडपाणी सोडण्यासाठी बोअर मारल्या आहेत. परिसरातील नद्या, नाले प्रदूषीत झाल्या आहेत. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून उपस्थित अधिकारी पाटोळे तसेच मुंबई येथून आलेले अधिकार्‍यांनी कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. राजू आंब्रे, महेश गोवळकर व अन्य स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीत घडलेल्या अपघाताबाबत माहिती विचारली व खुलासा मागितला. मात्र, कंपनीच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या खुलाश्याने त्यांचे समाधान झाले नाही. सध्या काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी, जर पीफास मानवाला घातक असेल तर त्याचे उत्पादनच का केले जाते आणि ते येथेच का केले जाते असा मुद्दा मांडला. यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

Comments
Add Comment