वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने जपले सामाजिक दायित्व
संतोष सावर्डेकर चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाला कोकणवासीयांची अलोट गर्दी होत असून पशुधन पाहण्याबरोबरच या पशुधन, पाककला स्पर्धांना देखील तितकाच प्रतिसाद मिळत आहे. कृषी महोत्सवातील ग्रामीण 'लुक' असलेली घरे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बैलगाडा शर्यतीमधील नामवंत बैलांची छबी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपण्यासाठी एकच गर्दी होत आहे. रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर पाककला स्पर्धांमधील पदार्थांचा सुगंध कृषी महोत्सवात दरवळला. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पातर्फे चिपळूण नगरपरिषदेच्या बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानावर दिनांक ५ जानेवारीपासून कृषी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या महत्त्वाच्या पहिल्या दिवसापासूनच कोकणवासीयांची चांगलीच गर्दी होत आहे. मंगळवारी पशुधन स्पर्धा पार पडली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपापली जनावरे आणून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. जास्त दूध देणारी म्हैस आणि गाय सुदृढ निरोगी बैल व रेडा अशा वेगवेगळ्या प्रकारात ही स्पर्धा पार पडली. पशुधन पाहण्यासाठी कोकण वासियांची गर्दी तसेच या प्रदर्शनास जगातील सर्वात कमी उंचीची राधा म्हैस, बैलगाडा शर्यतीमधील विजेता बैल राजा, शेतकरी विलास कांबळे यांचा सोना रेडा आणि अनेक स्पर्धांमधील विजेता सोना रेडा त्याचप्रमाणे दापोली येथील शेतकरी रमेश पाटील यांचा बकासुर बैल याच्या चार किलो वजनाचा कोंबडा, टर्की कोंबडा, परदेशी पोपट, अमेरिकन बकरी, पांढरी शुभ्र उमदे घोडे, लातूर येथील शेतकरी केरबा शिंदे यांचा वळू, लाल कंधारी जातीच्या गायी, खेड येथील शेतकरी अनिकेत महाडिक यांची सुंदरी म्हैस असे आगळे वेगळे पशुधन असल्याने पशु व कृषी प्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे.
रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
कृषी महोत्सवात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. रक्तदान शिबिरात सुमारे १३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संजीवनी सर्जिकल अँड जनरल हॉस्पिटलचे डॉ. अक्षय यादव आणि त्यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिरात महत्वपूर्ण योगदान दिले. दांपत्याचे रुग्णांनी आभार मानले आहेत.
कृषी महोत्सवात पाककलांचा दरवळला सुगंध
कृषी महोत्सवात गोड व तिखट पाककला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दर्जेदार पदार्थ बनवले. यावेळी या पदार्थांचा सुगंध कृषी महोत्सवात दरवळला.
कृषी महोत्सवाला ग्रामीणचा लूक
कृषी महोत्सवात जुन्या पद्धतीचे समाधान नावाने घर करण्यात आले आहे घराची रचना पाहिल्यानंतर जुने दिवस आठवल्याशिवाय राहत नाही. या घराला कृषी महोत्सवात आलेला प्रत्येक जण आवर्जून भेट देत आहे. याचबरोबर बांबूचे, लोहाराचे, कुंभाराचे घर ही घरे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याचबरोबर लाईव्ह फळबाग लागवडीचे डेमो सर्वांचे लक्ष वेधून घेत असून ज्ञानात भर पडत आहे. एकंदरीत या कृषी महोत्सवात कोकणी परंपरा आणि कृषी संस्कृतीची खरी ओळख पहावयास मिळत आहे. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्न यादव यांनी केलेल्या या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कोकणवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. तर खाऊगल्लीत खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जात आहे.






