Friday, January 9, 2026

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड दिशेने जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाला. ही घटना आज दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अंदाजे ११ ते १२ चारचाकी तसेच तीनचाकी वाहनांनी एकमेकांना धडक दिली. अचानक झालेल्या या साखळी अपघातामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. जखमींमध्ये ऑटो रिक्षा चालक शिवकुमार बेचू प्रसाद यादव (वय ५६), ओला कार चालक रामबली बाबुलाल (वय २२), रिक्षातील प्रवासी अनिता दिनेश पेटवाल (वय ४५) आणि तस्किर शफिक अहमद शेख (वय ४५) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने वाघबीळ येथील टायटन मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणाच्याही जखमा गंभीर नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले असून ते हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.

अपघातग्रस्त वाहनांमधील इतर नागरिक परस्पर निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक संथ झाली होती, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. घोडबंदर रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि विशेषतः घाट परिसरात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा