Friday, January 9, 2026

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व सहायक मतदान अधिकारी यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सध्या विविध ठिकाणी सुरू आहे. हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे व अनिवार्य असून, निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तरीही, जे अधिकारी - कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांनी तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांविरुद्ध निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही डॉ. जोशी यांनी दिला आहे.

राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.तर, शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या नेतृत्त्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसाठी एकूण मिळून १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. त्‍यासाठी १० हजार २३१ मतदान केंद्रे उभारण्‍यात येणार आहेत. एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रांसाठी एकूण मिळून ६४ हजार ३७५ अधिकारी - कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यासाठी निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पहिला प्रशिक्षण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, सध्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. तथापि, या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रास काही अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य व बंधनकारक आहे. जे अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांनी विनाविलंब तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करावे व निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या अथवा कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱया अधिकारी - कर्मचाऱयांविरुद्ध निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असा सक्‍त इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >