Friday, January 9, 2026

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. "राज ठाकरे हे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वाधिक मोठ्या पराभवाचे धनी म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल," अशा कडक शब्दांत फडणवीसांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे. या मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. हिंदुत्वाचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "कोणालाही जन्मामुळे वडिलांची मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळवण्यासाठी कर्तृत्व लागते. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाही." या विधानातून त्यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आणि विचारधारेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर माझी ही भविष्यवाणी खरी ठरेल, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले आहे. राज ठाकरे यांच्या 'किंगमेकर' होण्याच्या स्वप्नावर आणि उद्धव ठाकरेंच्या 'वारसा' सांगण्यावर फडणवीसांनी एकाच वेळी हल्ला चढवल्याने राजकीय वर्तुळात आता वादाला तोंड फुटले आहे.

२००९ मध्ये एकत्र आले असते तर...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हा राजकीयदृष्ट्या निरर्थक प्रयत्न असल्याचे सांगत, फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भविष्यातील राजकीय स्थितीवर मोठी भविष्यवाणी केली आहे. "या निवडणुकीत राज ठाकरे केवळ पराभूतच होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून त्यांची नोंद होईल," अशा शब्दांत त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला. दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी खूप उशीर केला आहे. जर ही युती २००९ मध्ये झाली असती, तर त्यांना मतांचा मोठा फायदा झाला असता आणि राज्याची राजकीय परिस्थिती काही वेगळी असती. पण आज त्यांच्याकडे स्वतःची हक्काची मतं उरलेली नाहीत. त्यामुळे या युतीचा राज ठाकरेंना कोणताही राजकीय लाभ होणार नाही." या युतीवर भाष्य करताना फडणवीस यांनी एक गणित मांडले. त्यांच्या मते, "राज ठाकरेंच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंना नक्कीच होऊ शकतो, मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याचा राज ठाकरेंना कोणताही फायदा होणार नाही. याउलट, राज ठाकरे आणि मनसे या युतीतील 'बिगेस्ट लूजर' (सर्वात जास्त नुकसान सोसणारे) ठरतील. निवडणुकीच्या निकालानंतर माझी ही भविष्यवाणी तुम्ही पडताळून पाहा," असे खुले आव्हानच फडणवीस यांनी दिले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >