राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश
मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ साठी मतदान प्रक्रियेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सत्र पूर्णत्वाकडे जात आहे. छायाचित्रांसह मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने काही ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांची माहिती राजकीय पक्ष व उमेदवारांना तत्काळ अवगत करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सर्व २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.
मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निर्भय व कायद्याच्या चौकटीत पार पाडावी. मतमोजणीदरम्यान सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत, हेतुपुरस्सर अथवा अनावधानानेही, चूक होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, विश्वासार्ह व पारदर्शक राहील याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आहे, असेही अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या अनुषंगाने महानगरपालिका उप आयुक्त, सहायक आयुक्त आणि २३ निवडणूक निर्णय अधिकारी यांची समन्वय बैठक गुरुवारी ८ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली.
राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ तसेच मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर उमेदवारांची शपथपत्रे प्रसिद्ध करणे, मतदार यादी, बदललेली मतदान केंद्रे,उमेदवार प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची अधिकृत तपासणी व कार्यान्वयन प्रक्रिया, मतमोजणी प्रस्ताव, उमेदवार व राजकीय पक्ष बैठक, मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणीसाठी कर्मचारी नेमणूक आदी प्रमुख विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अश्विनी जोशी यांनी सांगितले की, निवडणूक ही पूर्णतः निर्भय, मुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा पूर्ण कटिबद्ध आहे. त्या अानुषंगाने निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यासाठी सर्वंकष व व्यापक तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक बाब वेळेत, नियमबद्ध व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मनुष्यबळाचे प्रभावी व्यवस्थापन तसेच तांत्रिक बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडणे ही मोठी जबाबदारी असून, शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त, नियमित गस्त व तांत्रिक निगराणी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी मतमोजणी व्यवस्थापन, आवश्यक सुविधा तसेच सर्व कायदेशीर बाबींची काटेकोर अंमलबजावणी करावी. मतमोजणीची पद्धत पूर्वनिश्चित करून ती काटेकोरपणे राबविण्यात यावी. कोणत्याही प्रकारची सरमिसळ अथवा गोंधळ होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. मतमोजणी केंद्रांवर धातूशोधक यंत्रे लावावीत. टपाली मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व नियम व कार्यपद्धती कायद्यानुसार, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱयांनी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.






