पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांपर्यंत मंदिरात थेट दर्शन करता येणार नाही.
मंदिर परिसरातील सभामंडप, पायऱ्यांचा मार्ग, तसेच भाविकांच्या सुरक्षित प्रवेश-निर्गमनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही सर्व कामे सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाशिवरात्रीला दर्शन सुरू राहणार
तात्पुरत्या बंदीच्या कालावधीत महाशिवरात्रीचा कालावधी वगळण्यात आला असून, १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या काळात भाविकांसाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीत मंदिर परिसरात सर्वसामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने तयारी
जिल्हा प्रशासन, देवस्थानचे विश्वस्त, स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्यात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंदिर बंद ठेवून पायाभूत सुविधांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासकामांदरम्यान गर्दी टाळणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आवश्यक सुविधा उभारून ठेवण्यासाठी सध्या कामे हाती घेण्यात आली आहेत.
पूजा विधी नियमित, मात्र प्रवेश बंद
मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची दैनंदिन पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकाला थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भाविकांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, विकासकामांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे सांगितले आहे.






