Friday, January 9, 2026

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास

ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, या सर्व महापालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. अंबरनाथ नगर परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आज नवी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “या सर्व नगरसेवकांशी आम्ही सविस्तर चर्चा केली. निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतो आणि आपल्या प्रभागातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील असतो. विकासात्मक कामांना गती मिळावी, हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच हे नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment